परभणी जि़प़ विषय समित्यांची सोमवारी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:52 PM2020-01-13T23:52:43+5:302020-01-13T23:53:08+5:30
जिल्हा परिषदेच्या ४ विषय समित्यांच्या सभापतींची २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक होणार असून, यासाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या ४ विषय समित्यांच्या सभापतींची २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक होणार असून, यासाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची ७ जानेवारी रोजी निवड झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत विषय समित्यांच्या सभापतींची निवड करणे क्रमप्राप्त आहे़ त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांच्या मान्यतेने १० जानेवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे़ त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण समितीसह अन्य दोन समित्यांच्या सभापतींसाठी २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक घोषित करण्यात आली असून, पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामुळे आता आठ दिवसांत जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ या आठ दिवसांत सभापतीपद मिळविण्यासाठी जि़प़ सदस्यांमध्येही फिल्डींग लावण्याची तयारी सुरू झाली आहे़
सभापतीपदासाठी राष्ट्रवादीत चुरस कायम
४जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी सत्तेत आली आहे़ अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून, दोन सभापतीपदेही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहेत़ याशिवाय शिवसेनेकडे एक व काँग्रेसकडे एक विषय समितीचे सभापती पद जाऊ शकते़ ‘लोकमत’ला मिळालेल्या माहिती नुसार जि़प़चे शिक्षण व आरोग्य आणि समाजकल्याण ही दोन सभापतीपदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असू शकतात तर शिवसेना व काँग्रेसकडे महिला व बालकल्याण आणि कृषी सभापतीपद असू शकते़
४शिवसेना समाजकल्याण सभापतीपदासाठी आग्रही आहे़; परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस हे पद सेनेला देण्याची सुतराम शक्यता नाही़ त्यामुळे या पदासाठी राष्ट्रवादी-सेनेत चुरस निर्माण झाली आहे़ याशिवाय राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या दोन सभापतीपदांसाठीही पक्षांतर्गत मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे़ माजी आ़ विजय भांबळे यांच्या मर्जीतील सदस्यांनाच सभापतीपद मिळण्याची दाट शक्यता आहे़ दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेत स्पर्धक कमी आहेत़ पडद्यामागे यासाठी नावेही निश्चित झाले असल्याचे समजते; परंतु, ती जाहीर करून अन्य सदस्यांची नाराजी नको, म्हणून ऐनवेळी ती जाहीर केली जावू शकतात़