परभणीत मटका जोरात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:13 AM2017-12-14T01:13:28+5:302017-12-14T01:13:38+5:30
नोटबंदी, जीएसटीमुळे एकीकडे बाजारपेठेत मंदी असली तरी दुसरीकडे मटका, जुगार मात्र तेजीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. मंगळवारी आणि बुधवारी शहरात फेरफटका मारला तेव्हा दोन्ही दिवस अर्ध्या भागातील मटक्याच्या बुक्या बंद असल्याचे तर अर्ध्या भागात खुलेआम सुरू असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नोटबंदी, जीएसटीमुळे एकीकडे बाजारपेठेत मंदी असली तरी दुसरीकडे मटका, जुगार मात्र तेजीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. मंगळवारी आणि बुधवारी शहरात फेरफटका मारला तेव्हा दोन्ही दिवस अर्ध्या भागातील मटक्याच्या बुक्या बंद असल्याचे तर अर्ध्या भागात खुलेआम सुरू असल्याचे दिसून आले.
परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अवैध धंद्यांनी कळस गाठला आहे. मटका, जुगार हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत राहते, मात्र हे अवैध धंदे पूर्णत: बंद होत नाहीत. या पर्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार असे दोन दिवस ‘लोकमत’ने शहरात स्टिंग आॅपरेशन केले, तेव्हा मटका खुलेआम सुरू असल्याचे उघड झाले. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या स्टिंग आॅपरेशनला सुरूवात केली. येथील स्टेडियम मार्केट परिसरात काही पान टपºयांमधून मटक्याच्या चिठ्ठ्या दिल्या जात असल्याचे पहावयास मिळाले. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलशनाबाग परिसरात फेरफटका मारला तेव्हा या ठिकाणी तीन ते चार टपºयांमध्ये मटका खेळविला जात होता. गुलशनाबाग भागात १, अशोकनगर भागात एका ठिकाणी तर गौतमनगर येथे एका ठिकाणी मटका खेळला जात असल्याचे दिसून आले.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जायकवाडी परिसरातही मटका सुरू होता. याच भागात एका हॉटेलमध्ये मटका घेतला जात असल्याचेही दिसून आले. वांगी रोड भागातही रस्त्याच्या एका बाजूला मटका बुक्या सुरू होत्या तर दुसºया बाजूच्या बुक्या बंद असल्याचे दिसून आले. वांगीरोडवर कॅनॉलपर्यंत फेरफटका मारला तेव्हा काही मटक्याच्या टपºया बंद तर काही टपºयांमध्ये सर्रास मटका खेळविला जात होता.
शहरातील धाररोड, जुना मोंढा, नांदखेडा रोड या भागातही मटका सर्रास घेतला जात असल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे डनलॉपरोड परिसरातही मटका सुरू असल्याचे दिसून आले़
मटक्याच्या या व्यवहरातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मटका व इतर अवैध धंदे बंद करण्याची मागणी वारंवार होत असताना छोट्या-मोठ्या कारवाया करुन अवैध धंद्यांविरुद्ध कारवाया सुरू असल्याचे पोलिसांकडून दाखविले जाते. मात्र मटका बंद करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे.
सायंकाळी सुरू झाला मटका
शहरातील अनेक भागात मंगळवारी दुपारपर्यंत मटक्याची दुकाने बंद होती. ‘लोकमत’ चमूने पाहणी केली तेव्हाही अनेक भागातील मटक्याची दुकाने बंद दिसून आली. मात्र, सायंकाळी ४ वाजेनंतर शहरातील मटका बुक्या पुन्हा सुरू केल्याची माहिती मिळाली. मटका चालविणाºया मुख्य एजंटांमध्ये समझोता झाल्याने शहरातील सर्व मटका बुक्या सुरू झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारनंतर बुधवारी केलेल्या पाहणीतही मटका बुक्या सुरू असल्याचे दिसून आले.
पोलीस ठाण्यासमोरुच
मिळाल्या चिठ्ठ्या
परभणी शहरातील मटका बुकींचे स्टिंग आॅपरेशन करीत असताना प्रत्यक्ष मटक्याच्या चिठ्ठ्या मिळविण्याचा प्रयत्न केला. नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या समोरच सुरू असलेल्या बुकीवर मटका लावला, त्या ठिकाणी मटक्याच्या चिठ्ठ्याही हस्तगत केल्या.
वांगीरोड भागातही एका मटका बुकीवरुन प्रत्यक्ष चिठ्ठ्या मिळाल्याने शहरात मटका जुगार सुरू असल्याचेच दिसून आले. वांगीरोड भागात दोन ठिकाणी मटका खेळविला जात असल्याचे या पाहणीत दिसून आले.