परभणीत सिंचन परिषदेचा समारोप:मागणी, पुरवठा पाहून उत्पादन करा- दि.मा. मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:20 AM2018-01-01T00:20:03+5:302018-01-01T00:20:17+5:30
पिकांची बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याचा नियम लक्षात घेऊन शेतकºयांनी पिकांचे उत्पादन करावे, असे आवाहन सिंचन सहयोग परिषदेचे अध्यक्ष डॉ.दि.मा. मोरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पिकांची बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याचा नियम लक्षात घेऊन शेतकºयांनी पिकांचे उत्पादन करावे, असे आवाहन सिंचन सहयोग परिषदेचे अध्यक्ष डॉ.दि.मा. मोरे यांनी केले.
परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात सुरु असलेल्या दोन दिवसीय सिंचन परिषदेचा रविवारी समारोप झाला. अध्यक्षीय अभिभाषणात मोरे बोलत होते. यावेळी ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.गणेशराव दुधगावकर, परिषदेच्या अध्यक्षा डॉ.संध्याताई दुधगावकर, बापु अडकिणे, प्रा.पी.ए. ठोंबरे यांची उपस्थिती होती.
डॉ.मोरे म्हणाले, सिंचन, पाणी व्यवस्थापन, पीक पाणी, जोड धंदे याचा मेळ लावून शेतकºयांनी शेती केली पाहिजे. केवळ शेती करुन कोणताही देश प्रगती करु शकत नाही. तेव्हा शेतीशी निगडित उद्योग, व्यवसायाची जोड घेणे गरजेचे आहे. करपरा प्रकल्प काही इंचानी वाढविला तरी २ हजार ऐवजी ६ हजार हेक्टर क्षेत्र भिजवणीखाली येऊ शकते, असे ते म्हणाले.
या परिषदेच्या पहिल्या सत्रात विजयअण्णा बोराडे यांनी सिंचनाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला. दुसºया सत्रात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.व्ही.एम. मायंदे यांनी जमिनीतील, वातावरणातील ओलावा टिकविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. या.रा. जाधव, डॉ. भगवानराव कापसे यांचेही भाषण झाले. डॉ.व्ही.एम. मायंदे यांनी सत्राचा अध्यक्षीय समारोप केला. प्रा.डॉ.भीमराव खाडे यांनी आभार मानले. तिसºया सत्रात ग्रामसफाई अभियानाचे माधवराव पाटील शेळगावकर, व्ही.एम. रानडे, निवृत्त कार्यकारी अभियंता सावळेश्वरकर, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा.ब. घोटे, महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरण पाणीवाटप व्यवस्थापनाचे सचिव डॉ.सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रात डॉ.पी.ए. ठोंबरे, डॉ.अनिल बुलबुले, छत्रपती मानवते आदींनी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. परिषदेमध्ये प्रा.हरिश्चंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आडे यांनी केले. या परिषदेस शेतकरी, शेतमजूर, विषय तज्ज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.