परभणीकर गारठले, पारा आठ अंशावर; शहर परिसरात हुडहुडी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:43 PM2023-02-04T12:43:35+5:302023-02-04T12:46:48+5:30
मराठवाडा विभागात पुढील ३ ते ४ दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू एक ते दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता
परभणी : शहर परिसरात नागरिकांना शुक्रवारची सकाळ थंडीने हुडहुडणारी ठरली. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच किमान तापमान दहा अंशाखाली आले होते. शुक्रवारी किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिली. या तापमानाने परभणीकर गारठल्याचे दिसून आले.
शहरात डिसेंबर महिन्यात, जानेवारी महिन्यात दोन ते तीन वेळेला किमान तापमान १० अंशाखाली आले होते. सर्वाधिक कमी तापमान ५.६ अंश सेल्सिअस नोंद झाले होते. त्यानंतर हळूहळू तापमानात दररोज सातत्याने वाढ झाली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बुधवारी किमान तापमान १५.६, गुरुवारी १२.४ अंश सेल्सिअस नोंद झाले होते. गुरुवार पेक्षा शुक्रवारी किमान तापमानामध्ये चार अंशाची घट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी थंडी वाढल्याने शहरात जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला होता. दुपारपर्यंत वातावरणात गारवा कायम होता.
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाडा विभागात पुढील ३ ते ४ दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू एक ते दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे तर १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.