परभणीकरांनो सतर्क रहा, हवामान विभागाकडून जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’
By ज्ञानेश्वर भाले | Published: July 20, 2023 11:42 AM2023-07-20T11:42:05+5:302023-07-20T11:43:51+5:30
नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून निर्देश
परभणी : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र, मुंबईने दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासह इतर ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सचिव स्वाती दाभाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
नैसर्गिक आपत्तीसंदर्भात खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा, घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका, तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा, पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचनाही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहे. यासह विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत, शेडमध्ये आसरा घेऊ नका आदींची सूचनांकडे नागरिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.