परभणीकरांचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण : बहुप्रतिक्षीत नाट्यगृहाच्या बांधकामाला झाली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:52 PM2019-08-18T23:52:19+5:302019-08-18T23:54:07+5:30
जिल्हावासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या अद्यायवत नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, लवकरच परभणीतील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे़ हे नाट्यगृह दर्जेदार आणि अद्यायवत असेल, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हावासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या अद्यायवत नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, लवकरच परभणीतील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे़ हे नाट्यगृह दर्जेदार आणि अद्यायवत असेल, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़
परभणी शहरातील नटराज रंग मंदिराची दुरवस्था झाल्यानंतर शहरवासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यासाठी नाट्यगृह उपलब्ध नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत होते़ शहरात दर्जेदार असे नाट्यगृह असावे, अशी शहरवासियांची मागणी होती़ ही मागणी लक्षात घेऊन आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी नाट्यगृहासाठी पाठपुरावा सुरू केला़ त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि शहरात नाट्यगृहाच्या उभारणीसाठी शासनाने निधी मंजूर केला़ शासनाच्या मुलभूत सोयी, सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत येथील स्टेडियम परिसरातील बचत भवनमध्ये नाट्यगृहाची इमारत उभी राहणार असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़
१८ कोटी १६ लाख ३९ हजार रुपये या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी लागणार असून, त्यापैकी १० कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष उपलब्ध झाला आहे़ परभणी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी अनेक बारकावे लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत़ त्यात खालच्या मजल्यावर अद्यायवत प्रवेशद्वार, सुसज्ज उपहारगृह, ग्रीन रुम, स्वच्छतागृह, वरच्या मजल्यावर स्वतंत्र बालकणी कक्ष, गेस्ट रुम, कॉन्फ्रन्स हॉल, प्रशस्त लॉबी, स्वच्छतागृह असणार आहे़ या व्यतिरिक्त दुसºया मजल्यावर ७ हजार २६३ चौरस फुट आकाराची आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे़ परभणी जिल्ह्यातील विविध कलावंतांच्या कलाकृतीचे प्रदर्शन व त्यांच्या कलागुणांचे दर्शन व्हावे, यासाठी पुणे येथील बालगंधर्व कला दालनाच्या धरतीवर ही आर्ट गॅलरी उभारली जाणार आहे़ या नाट्यगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली असून, पुणे येथील निखील कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम करीत आहे़ या कंपनीला बांधकाम करण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली असल्याची माहिती आ़डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़
एक हजार आसन क्षमतेची सुविधा
४परभणी शहरात उभारण्यात येणाºया या नाट्यगृहाची आसन क्षमता एक हजार एवढी असून, ७९ हजार ६०० चौरस फुट क्षेत्रावर नाट्यगृहाची उभारणी केली जाणार आहे़
४ त्यापैकी ४७ हजार ५२९ चौरस फुट क्षेत्रफळावर प्रत्यक्ष बांधकाम केले जाणार आहे़ त्यामध्ये १३ हजार ७१९ चौरस फुटाची जागा वाहन तळासाठी ठेवण्यात आली आहे़
४परभणीत उभारले जाणारे हे नाट्यगृह शहराच्या वैभवात भर घालणारे ठरेल, अशा पद्धतीने बांधकाम केले जाणार आहे़, अशी माहिती आ.डॉ.पाटील यांनी दिली.