परिवर्तनाच्या पारड्यात परभणीकरांचा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:36+5:302021-01-20T04:18:36+5:30
परभणी : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात अनेक ग्रामपंचायतींत मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. प्रस्थापितांना बाजूला ठेवत नव्या दमाच्या युवकांना मतदारांनी ...
परभणी : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात अनेक ग्रामपंचायतींत मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. प्रस्थापितांना बाजूला ठेवत नव्या दमाच्या युवकांना मतदारांनी संधी दिली. परिवर्तनाच्या दिशेने मतदारांनी दिलेला हा कौल प्रस्थापितांना मात्र आत्मपरिक्षण करायला लावणारा ठरला आहे.
तालुक्यात झरी, जांब, सिंगणापूर, आर्वी, पोखर्णी, कुंभारी या गावांतील लढतीकडे लक्ष लागले होते. बहुतांश गावांत सरळ लढती झाल्या. त्यात अनेक ठिकाणी मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. प्रस्थापितांच्या मागील कार्यकाळातील कार्यपद्धतीलाच मतदारांनी नाकारले आहे. झरी ही या तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. १७ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीवर यापूर्वी कांतराव झरीकर यांचे वर्चस्व होते. मात्र या वेळच्या निवडणुकीत कांतराव झरीकर हे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. त्यामुळे शिवसेनेचे गजानन देशमुख, डॉ.प्रमोद देशमुख यांच्या पॅनलने १० जागांवर विजय मिळवित ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तन झाल्याचे पहावयास मिळाले. त्यात सिंगणापूर येथे रोकडोबा परिवर्तन पॅनलने १३ पैकी ९ जागा जिंकून वर्चस्व मिळविले. तालुक्यातील आर्वी ग्रामपंचायत यापूर्वी भाजपाचे डी.एस. कदम यांच्या ताब्यात होती. मात्र यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी लोकशाही शक्ती पॅनलला झुकते माप दिले. या पॅनलचे ११ पैकी ९ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ग्रा.पं.वर पॅनलने वर्चस्व मिळविले. कुंभारी बाजार येथेही जयनृसिंह ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ६ जागा जिंकून ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. या ग्रामपंचायतीवर बळीराजा ग्रामविकास पॅनल या सत्ताधारी पॅनलचा पराभव केला आहे.
जांब ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व
तालुक्यातील जांब ग्रामपंचायत निवडणुकीत संग्राम बाळासाहेब जामकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसंग्राम ग्रामविकास पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवून सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संग्राम जामकर यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायतीवर आता शिवसेनेेने वर्चस्व मिळविले आहे.