पावणेचार कोटींच्या निधीतून परभणीकरांना कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:25 AM2018-02-05T00:25:57+5:302018-02-05T00:26:12+5:30

शहरातील नेहरू पार्क, शिवाजी पार्क या दोन प्रमुख उद्यानांबरोबरच वसाहतींमधील उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध झाला आहे़ काही कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम मात्र सुरू झाले नसल्याने उद्यान विकासासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़

Parbhanikar's wait for work from the funding of Rs | पावणेचार कोटींच्या निधीतून परभणीकरांना कामांची प्रतीक्षा

पावणेचार कोटींच्या निधीतून परभणीकरांना कामांची प्रतीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील नेहरू पार्क, शिवाजी पार्क या दोन प्रमुख उद्यानांबरोबरच वसाहतींमधील उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध झाला आहे़ काही कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम मात्र सुरू झाले नसल्याने उद्यान विकासासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़
परभणी शहरात राजगोपालचारी उद्यानाबरोबरच नेहरू पार्क, शिवाजी पार्क आणि गांधी पार्क हे तीन उद्याने आहेत़ त्यापैकी गांधी पार्क वगळता नेहरू पार्क आणि शिवाजी पार्क या दोन्ही उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ लॉन, झाडी नसल्याने ही उद्याने बकाल अवस्थेत आहेत़ या उद्यानांचा विकास करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे़ महापालिकेने उद्याने निर्माण केली़ परंतु, या उद्यानांची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ विशेष म्हणजे, ही दोन्ही उद्याने शहराच्या मध्यभागी असून, सुशोभीकरण व इतर कामे झाली नसल्याने या उद्यानांचा दुरुपयोग वाढला आहे़
या दोन्ही उद्यानांबरोबरच परिसरातील वसाहतींमधील उद्याने विकसित करण्यासाठी मनपाला निधी उपलब्ध झाला आहे़ नेहरू पार्कच्या विकास कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, या ठिकाणी सुशोभीकरणासह इतर कामे करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे़ मात्र प्रत्यक्षात या कामांना सुरुवात झालेली नाही़ अमृत योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये नेहरू पार्कच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे़ महापालिकेने या ठिकाणी कामांचे नियोजनही केले असले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही़ अमृत योजनेबरोबरच जिल्हा नियोजन समितीचा निधीही महानगरपालिकेला मिळाला आहे़ या निधीमधून शिवाजी उद्यानात संरक्षक भिंत बांधली जाणार आहे़ त्यासाठी देखील महापालिकेने प्रयत्न सुरू केले असून, संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू झाले आहे़ शिवाजी उद्यान हे मध्यवस्तीत असून, या ठिकाणी सुशोभीकरणाचेही कामे होणे बाकी आहेत़ झाडे व लॉन टाकून उद्यानाचा विकास करणे अपेक्षित असून, त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़ एकंदर मनपाला उद्यान विकासासाठी निधी उपलब्ध झाला असून, कार्यारंभ आदेशही दिले आहेत़ तेव्हा प्रत्यक्षात कामांना गती द्यावी, अशी मागणी होत आहे़
अमृत योजनेतून : दोन कोटींची कामे
अमृत योजनेंतर्गत शहरातील हरितक्षेत्र विकासासाठी २०१७-१८ या वर्षात महानगरपालिकेला १ कोटी ९९ लाख ९९ हजार ४६१ रुपये मंजूर झाले आहेत़ या रकमेतून सर्वे नंबर ५८७, ५८६ या ठिकाणी बगीचा विकसित करणे आणि ग्रीन बेल्ट विकसित करण्याची कामे केली जाणार आहेत़ मनपाने या कामांचे कार्यारंभ आदेशही काढले असून, एका वर्षात ही कामे पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला दिली आहे़ दोन महिन्यांपूर्वी या विकास कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला असून, ही कामे गतीने पूर्ण झाल्यास बगीचा विकसित होणार आहे़
त्याचप्रमाणे अमृत योजनेतूनच २०१६-१७ या वर्षात हरितक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मुमताज नगर येथील बगीचा आणि दत्तनगर येथील बगीचा विकसित करणे, ग्रीन बेल्ट विकसित करण्यासाठी १ कोटी ७९ लाख ९८ हजार ९३ रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामांचे कार्यारंभ आदेशही महापालिकने दिले आहेत़ या कामासाठी देखील एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे़ त्यामुळे शहरातील ही दोन्ही कामे पूर्ण होण्यासाठी शहरवासियांना किमान एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे़
अनेक वर्षांपासून उद्यानांची दुरवस्था
शहरातील सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ राजगोपालचारी उद्यान हे शहरातील मुख्य उद्यान असून, या उद्यानातही अनेक विकास कामे होणे बाकी आहे़ सद्यस्थितीला उद्यानातील खेळणी खराब झाली असून, लॉन विकसित करणे तसेच नवीन खेळणी वाढविल्यास उद्यानाच्या सौंदर्यात भर पडू शकते़ त्यामुळे शहरातील उद्याने विकसित करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन कामे पूर्ण करावित, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhanikar's wait for work from the funding of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.