परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा; विमा कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:10 PM2018-04-17T14:10:48+5:302018-04-17T14:10:48+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.
नवा मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सकाळी ११ वाजताच तालुक्यातील शेतकरी मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाली. मार्केटयार्डात उपस्थित शेतकऱ्यांना कृउबा संचालक गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, शिवाजी बेले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गेे पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला.
शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यातील खरीप हंगामात पावसाचा ताण पडल्याने सोयाबीन पिकाचे जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते. जिल्ह्यातील प्रशासनाने ३५ टक्के आणेवारी काढली असताना शेतकऱ्यांना किमान हेक्टरी ४० हजार रुपये विम्याची जोखीम रक्कम मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मुठभर शेतकऱ्यांनाच त्या विम्याचा लाभ देण्यात आला आहे़ उर्वरित शेतकऱ्यांना विमा योजनेतून वगळण्यात आले आहे़ त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या केल्या. या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना देण्यात आले़
मोर्चात भारत कच्छवे, अमोल चव्हाण, माणिकराव वाघ, तुकाराम गिराम, राजाराम गमे, माणिकराव शिंदे, राम धनकोंड, अमर रायमले, मोहन कच्छवे, त्र्यंबकराव बुचाले, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, भक्तराज लवंडे, अब्दुल भाई, गजानन बाबर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.