परभणीचा वीज पुरवठा दिवसभर खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:18 AM2019-08-29T00:18:55+5:302019-08-29T00:19:22+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील विजेची कामे करण्याच्या उद्देशाने शहरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील विजेची कामे करण्याच्या उद्देशाने शहरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़
महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्यात येत आहेत़ मुख्यमंत्री फडणवीस यांचे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत, त्या ठिकाणच्या वीज दुरुस्तीची कामे करून घ्यावीत, मुख्यमंत्र्यांच्या दौºयात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेश महावितरणने दिल्याने बुधवारी दिवसभर शहरामध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कामे केली़ यासाठी शहराचा वीज पुरवठा सकाळी १० वाजेपासूनच खंडित करण्यात आला़ जिंतूर रोड, वसमत रोड या प्रमुख मार्गावर कामे करण्यात आली़ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात स्वतंत्र वीज वाहिनी टाकण्याचे कामही बुधवारी करण्यात आले़ या कामांमुळे दिवसभर शहरातील वीज पुरवठा खंडित होता़ मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे़ दमट वातावरणामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यातच वीज पुरवठा खंडित ठेवल्याने नागरिकांची उकाड्याने घालमेल झाली़ सायंकाळी साधारणत: ४ वाजेच्या सुमारास काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला़
असे आहेत वीज कर्मचाºयांना दिलेले आदेश
४मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांनी १३ आॅगस्ट रोजी कार्यकारी अभियंत्यांना पत्र काढून सुचना दिल्या आहेत़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री भेट देणार असून, आपल्या कार्यक्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी ते भेट देणार आहेत, त्या ठिकाणची उच्चदाब वाहिनी, लघुदाब वाहिनी व वितरण रोहित्रांची देखभाल दुरुस्ती करणे, वाकलेले, तुटलेले वीज खांब सरळ करणे, ढिल्या तारांना ताण देणे, वितरण पेटी व रोहित्रांची देखभाल दुरुस्ती करणे, या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे आदी कामे तातडीने करून त्याचा अहवाल पाठवावा, अशा सूचना दिल्या आहेत़ त्यानुसार शहरासह दुरुस्तीची कामे सुरू होती़