परभणीचा पारा घसरला; तापमान ९.५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 05:00 PM2021-12-20T17:00:20+5:302021-12-20T17:01:16+5:30
मागील चार दिवसांपासून तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे.
परभणी : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घसरण होत असून, सोमवारी ९.५ अंशापर्यंत तापमानात घसरण झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा सामना करावा लागला.
या वर्षीच्या हिवाळ्यात उशिराने थंडीला सुरुवात झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानामध्ये मोठी घसरण होत असल्याने थंडी वाढली आहे. सध्या थंडीची लाट पसरली असून, जनजीवन काही अंशी विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. किमान तापमानामध्ये दररोज घसरण होत असून वाढलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर केला जात आहे. पहाटेच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्याही दोन दिवसांपासून रोडावली आहे. सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण होत असल्याने रस्त्यावरील वाहतूकही विरळ होत आहे.
मागील चार दिवसांपासून तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. रविवारी १०.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी या तापमानात साधारणता १.१ अंशांची घट झाली असून, ९.५ अंश किमान तापमान नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली. येणाऱ्या चार दिवसांमध्ये तापमानामध्ये फारशी तफावत जाणवणार नाही, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमान ९ ते १० अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.