सकाळी आई-वडील खोलीच्या बाहेरच आले नाही; मुलाने ग्रामस्थांसह दरवाजा तोडताच बसला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 01:57 PM2022-01-10T13:57:04+5:302022-01-10T14:00:37+5:30
पती-पत्नीची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालम तालुक्यातील पूयनी येथे उघडकीस आली आहे.
पालम (परभणी ) : तालुक्यातील पुयनी येथील पती-पत्नीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही घटना 10 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. सुनिता रंगनाथ शिंदे आणि रंगनाथ असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. सकाळी त्यांच्या मुलाने आई-वडील दरवाजा उघडत नसल्याचे पाहून ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर हे धक्कादायक चित्र समोर आले.
पुयनी येथील रंगनाथ हरिभाऊ शिंदे (वय 40) आणि सुनिता रंगनाथ शिंदे (वय 35) यांच्या खोलीचे दार सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत उघडले नव्हते. शेतातून आल्यावर त्यांचा मुलगा अंगद याने आई-वडील झोपलेल्या खोलीचा दरवाजा वाजविला. बऱ्याच वेळानंतरही खोलीतून आवाज आला नाही. म्हणून मुलाने ग्रामस्थांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघांनीही घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती पुयनी येथील पोलीस पाटील गेंदे यांच्यामार्फत पालम पोलिसांना देण्यात आली. पालम ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहत्तरे, फौजदार विनोद साने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह पालम ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत या घटनेची नोंद पालम पोलिसात झालेली नव्हती.
पूर्णा तालुक्यात नवदाम्पत्याने संपवले जीवन
लग्नात आयुष्यभर साथ देण्याचे एकमेकांना वचन देणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याने सहा महिन्यातच टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपविल्याची घटना रविवारी सकाळी पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे उघडकीस आली आहे. गंगाधर विश्वनाथ चापके (२५) आणि सपना गंगाधर चापके (२१) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. गंगाधर चापके आणि सपना चापके यांचा साधारणत: सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच अवघ्या काही महिन्यातच या दोघांनीही विष प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याने गावात खळबळ उडाली आहे.