घरकुल सर्वेक्षणात परभणी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:26 PM2018-10-10T23:26:11+5:302018-10-10T23:26:38+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात केलेल्या सर्वेक्षणात परभणी तालुक्याने आघाडी घेतली असून, तालुक्यातील २४ हजार ८७१ लाभार्थ्यांचे प्रपत्र भरुन घेण्यात आले आहेत. इतर तालुक्यात मात्र या सर्वेक्षणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात केलेल्या सर्वेक्षणात परभणी तालुक्याने आघाडी घेतली असून, तालुक्यातील २४ हजार ८७१ लाभार्थ्यांचे प्रपत्र भरुन घेण्यात आले आहेत. इतर तालुक्यात मात्र या सर्वेक्षणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र अनेक लाभार्थी पात्र असतानाही त्यांची नावे योजनेत समाविष्ट झाली नसल्याने जिल्हा परिषद स्तरावर ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरुन घेण्याची मोहीम राबविण्यात आली. १ ते ३० सप्टेंबर या काळात प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची महिती घेऊन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरण्याचे काम करण्यात आले. प्रपत्र ड आॅनलाईन अपलोड करण्यासाठीही कंत्राटी तत्त्वावर आॅपरेटर नियुक्त केले होते.
लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. या काळात प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत कामकाज करण्यात आले. त्यात परभणी तालुक्यात सर्वाधिक २४ हजार ८७१ लाभार्थ्यांचे प्रपत्र भरण्यात आले आहेत.
परभणी तालुक्यासाठी ३७ हजार लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांचे प्रपत्र भरुन घेण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्या तुलनेत २४ हजार ८७१ लाभार्थ्यांचे प्रपत्र आॅनलाईन भरुन पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत संपली असून, परभणी तालुक्यातील सर्वाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
सोनपेठ तालुक्यात अल्प प्रतिसाद
परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामीण लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यासाठी एक महिन्याच्या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सोनपेठ तालुक्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या तालुक्यामध्ये केवळ ७ हजार ५०१ लाभार्थ्यांचेच प्रपत्र भरण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गंगाखेड तालुक्यात १७ हजार २६, जिंतूर- २३ हजार ८४६, मानवत- ९ हजार ७४, पालम- ९ हजार ७१८, परभणी- २४ हजार ८७१, पाथरी - ९ हजार २ आणि पूर्णा तालुक्यात ११ हजार ५२७ आणि सेलू तालुक्यात ११ हजार ७२३ असे एकूण १ लाख २४ हजार २८८ लाभार्थ्यांचे आॅनलाईन प्रपत्र ड भरण्यात आले आहेत.
मुदतवाढ मिळाल्यास वाढतील लाभार्थी
परभणी तालुक्यामध्ये ५ हजार १२९ लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मात्र मुदत संपल्याने या लाभार्थ्यांचे फोटो अपलोड करणे बाकी आहे. शासनाने प्रपत्र ड भरण्यासाठी मुदतवाढ दिली तर उर्वरित लाभार्थ्यांचीही आॅनलाईन नोंदणी करुन त्यांना योजनेचा लाभ मिळेल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती परभणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.एस. सारुक यांनी दिली.