पॅसेंजर रेल्वे अद्यापही लॉक का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:00+5:302021-08-19T04:23:00+5:30
दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या परभणी रेल्वे स्थानकावरून सध्या २० ते २२ विशेष एक्स्प्रेस रेल्वे व केवळ ३ डेमू पॅसेंजर ...
दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या परभणी रेल्वे स्थानकावरून सध्या २० ते २२ विशेष एक्स्प्रेस रेल्वे व केवळ ३ डेमू पॅसेंजर रेल्वे सुरू आहेत. यामुळे छोट्या-मोठ्या स्थानकासह तालुक्याच्या ठिकाणी कमी पैशांमध्ये पोहचणे अवघड झाले आहे. यामुळे पॅसेंजर सुरु होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे. यापूर्वी या मार्गावरून जवळपास १४ ते १५ पॅसेंजर रेल्वे सुरू होत्या.
बंद असलेले पॅसेंजर रेल्वे
नांदेड-दौंड, निजामाबाद-पंढरपूर, पंढरपूर-निजामबाद, निजामाबाद-पुणे, पुणे-निजामाबाद, मिरज-परळी, परभणी-नांदेड, काचिगुडा-मनमाड, मनमाड-काचिगुडा, नांदेड-नगरसोल, औरंगाबाद-हैदराबाद.
सुरू असलेल्या एक्स्प्रेस
परभणी मार्गावरून सध्या २० ते २२ एक्स्प्रेस रेल्वे सुरू आहेत. मात्र, या एक्स्प्रेस रेल्वेला विशेष रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे याचे तिकीटही अतिरिक्त भरावे लागत आहे. यात नांदेड-मुंबई (तपोवन), नांदेड-बेंगलोर, नांदेड-अमृतसर (सचखंड), नांदेड-मुंबई (राज्यराणी), नांदेड-पनवेल, नांदेड-पुणे (साप्ताहिक), धर्माबाद-मनमाड (मराठवाडा), मनमाड-सिकंदराबाद (अजंठा), सिकंदराबाद-मुंबई (देवगिरी) आदिलाबाद-मुंबई (नंदीग्राम) रेल्वे सुरू आहेत.
रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना...
दररोज रेल्वेने ये-जा करण्यासाठी महिन्याचा पास दिला जात होता. सध्या पास दिला जात आहे; मात्र तो केवळ तीन डेमू गाड्यांना लागू केला आहे. उर्वरित पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेला या पासद्वारे ये-जा करण्याची परवानगी नाही. यामुळे अतिरिक्त तिकीट काढून विशेष रेल्वेने जावे लागत आहे.
- अक्षय कुलकर्णी, परभणी.
पॅसेंजर रेल्वेचे तिकीट दर वाढविले आहेत. याचबरोबर विशेष रेल्वेचा दर्जा देऊन २० ते ३० रुपये आरक्षणामध्ये वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांची मागील वर्षभरापासून आर्थिक लूट सुरू आहे. कोरोनापूर्वी असलेले पॅसेंजर रेल्वेचे दर लागू करावेत तसेच सर्व पॅसेंजर सुरू कराव्यात.
- केशव यादव, पूर्णा.