प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार
By राजन मगरुळकर | Published: May 16, 2023 04:13 PM2023-05-16T16:13:23+5:302023-05-16T16:14:50+5:30
काचीगुडा- नगरसोल विशेष रेल्वे गुरुवारी धावणार आहे तर नगरसोल- काचीगुडा ही रेल्वे शुक्रवारी धावणार आहे.
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांमुळे काचीगुडा- नगरसोल- काचीगुडा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेची प्रत्येकी एक फेरी होणार आहे.
काचीगुडा- नगरसोल विशेष रेल्वे गुरुवारी धावणार आहे तर नगरसोल- काचीगुडा ही रेल्वे शुक्रवारी धावणार आहे. या रेल्वेला एकूण २२ डबे जोडलेले असतील. यामध्ये वातानुकूलित डबे, शयनयान डबे आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश असेल. रेल्वे क्रमांक (०७१८७) काचीगुडा- नगरसोल ही रेल्वे १८ मे रोजी गुरुवारी काचीगुडा येथून दुपारी ३:५० वाजता सुटणार आहे. ही रेल्वे सिकंदराबाद, बेगमपेठ, विकाराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, रोटेगावमार्गे नगरसोल येथे शुक्रवारी सकाळी सात वाजता पोहोचणार आहे.
नगरसोल येथून शुक्रवारी धावणार
परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक (०७१८८) नगरसोल- काचीगुडा ही शुक्रवारी रात्री आठ वाजता सुटणार आहे. ही रेल्वे याच मार्गाने काचीगुडा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे. उन्हाळ्यानिमित्त विशेष रेल्वे सोडण्याच्या केलेल्या मागणीनुसार सदरील रेल्वे धावणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे.