परभणी-गंगाखेड रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे पितळ उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:36 AM2017-12-27T00:36:56+5:302017-12-27T00:37:07+5:30
खड्ड्यांचा रस्ताच म्हणून परिचित असलेल्या परभणी-गंगाखेड रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले असून, लाखो रुपये खर्च करून केलेली मलमपट्टी वरवरचीच असल्याची बाब ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी/गंगाखेड : खड्ड्यांचा रस्ताच म्हणून परिचित असलेल्या परभणी-गंगाखेड रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले असून, लाखो रुपये खर्च करून केलेली मलमपट्टी वरवरचीच असल्याची बाब ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आली आहे़
परभणी-गंगाखेड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ४३ किमीचा प्रवास करण्यासाठी वाहनधारकांना तब्बल दीड ते दोन तासांचा कालावधी लागत होता़ या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी फक्त खड्डेच असल्याने राज्यभर हा रस्ता कुपरिचित झाला होता़ त्यामुळे परभणीतील काही सामाजिक संघटनांनी या रस्त्याचे ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्सप्रेस हायवे’ असे उपहासात्मक नामकरण केले होते़ त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी परभणी दौºयावर आल्यानंतर या रस्त्यासह जिल्हाभरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्याचे जाहीर केले होते़ त्यामुळे पाटील हे त्यांचे आश्वासन पूर्ण करतील, अशी जिल्हावासियांची अपेक्षा होती़ परंतु, १५ डिसेंबर रोजी ‘लोकमत’च्या वतीने जिल्हाभरात करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये बहुतांश रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याची स्थिती पहावयास मिळाली होती़ परभणी-गंगाखेड रस्त्यावरही काही ठिकाणी खड्डे बुजविलेले दिसले तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे कायम असल्याचे पहावयास मिळाले़ त्यावेळी सा़बां़ विभागाकडून अद्याप खड्डे बुजविण्याचे काम सुरूच आहे, असे सांगण्यात आले होते़ त्यानंतर जवळपास १० दिवसांनी या रस्त्याच्या कामाचा २६ डिसेंबर रोजी आढावा घेतला असता खड्डे बुजविण्याचे सा़बां़ विभागाचे पितळ उघडे पडल्याचे दिसून आले़
गंगाखेड ते पोखर्णी हा रस्ता १९ किमीचा रस्ता सा़बां़च्या गंगाखेड उपविभागांतर्गत येतो़ यातील खळीफाटा ते सायाळा पाटी दरम्यान दीड किमी अंतरावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्वीच्याच कंत्राटदाराकडून करून घेण्यात आले़ दुसलगाव पाटी ते खळी पाटी या २ किमी रस्त्यावरील खड्ड्यांचे काम फेर दुरुस्तीमध्ये करण्यात आले़ गंगाखेड ते पोखर्णी फाटा या १९ किमी अंतरावरील उर्वरित १५़५ किमीवरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी २५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला़ नेमके हेच काम थातूर-मातूर करण्यात आल्याचे दिसून येत आहे़ दुसलगाव पाटीजवळील विटभट्टीपासून ते गोदावरी पुलाच्या दुसºया बाजुला खळी पाटीपर्यंत या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत़ या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले आहेत तर काही ठिकाणचे खड्डे तसेच सोडून देण्यात आले आहेत़ त्यामध्ये या रस्त्यावर ज्या ठिकाणी ८ ते १० खड्डे आहेत तेथील ५ ते ६ खड्डे बुजविण्यात आले असून, उर्वरित ४ ते ५ खड्डे तसेच सोडून देण्यात आले आहेत़ शिवाय दैठणा ते खळी पाटीपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता खचलेला असल्याने वाहने चालविताना नेहमी दोन्ही बाजुने ती झुकत चालतात़ संबंधित कंत्राटदाराने हा रस्ता दुरुस्त करताना रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आलेले नाही़ शिवाय रस्त्यावर जागोजागी खडी टाकलेली आहे़ कामगार मात्र जागेवरून गायब असल्याचे दिसून आले़ खळी पाटीजवळ मंगळवारी काही कामगार काम करीत असल्याचे दिसून आले़
दुसरीकडे परभणी बांधकाम उपविभागांतर्गत येणाºया परभणी ते पोखर्णी या २२ किमी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे़ परंतु, या कामावर किती खर्च करण्यात आला, याची माहिती उपअभियंता खंडेलवाल यांच्याकडे नाही़ या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेगवेगळ्या हेडमधून हे काम करण्यात आल्याचे सांगितल़े़ त्यामध्ये काही ठिकाणी पूर्वीच्याच कंत्राटदाराकडून फेर दुरुस्ती करून घेण्यात आली, काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे नव्याने काम देण्यात आले, असे ते म्हणाले़ निश्चित कोठून कोठपर्यंत काम देण्यात आले हे बाहेरगावी दौºयावर असल्यामुळे सांगता येत नाही, असेही ते म्हणाले़ प्रत्यक्षात या रस्त्याची पाहणी केली असता, परभणी शहरातील उड्डाणपुलापासून सुरू होणाºया या रस्त्यावर उड्डाणपुलावरच खड्डे दुरुस्त केलेले नाहीत़
जुना टोलनाका ते ब्राह्मणगाव दरम्यान काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले आहेत़ परंतु, थातूरमातूर काम झाल्याचे दिसून आले़ ब्राह्मणगाव ते सिंगणापूर फाटा दरम्यान खडी केंद्राजवळील रस्त्यावर लहान स्वरुपातील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत़ ताडपांगरी ते पोखर्णीफाट्या दरम्यान, काही ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले आहेत तर काही ठिकाणचे खड्डे तसेच सोडून देण्यात आले आहे़ त्यामुळे वाहन चालकांना दोलायमान स्थितीत वाहने चालवण्याची कसरत करावी लागत असल्याचे पहावयास मिळाले़
मंजूर रस्ता कामाबाबत निर्माण झाला संभ्रम
परभणी शहरातील उड्डाणपुलापासून पुढे तीन किमी अंतरापर्यंतच्या रस्ता कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली़ याबाबतची निविदा परभणी येथील एका कंत्राटदाराला सुटली़ सदरील कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे परभणीचे उपअभियंता खंडेलवाल यांनी दीड महिन्यापूवी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते़ परंतु, या रस्त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही़ काम का सुरू झालेले नाही, याबाबत खंडेलवाल यांच्याशी मंगळवारी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कंत्राटदारामार्फंतच खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले़ काम सुरू होईल, असे सांगितले़
४विशेष म्हणजे परभणी ते गंगाखेड हा रस्ता राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत वर्ग करण्यात आला असून, या रस्त्याच्या २०२ कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत़ असे असतानाही ३ किमी रस्ता कामासाठीचे १ कोटीचे काम कसे काय कायमस्वरुपी ठेवले? याचे मात्र उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेले नाही़