पाथरी तालुक्यात पशु दवाखान्यांत लसीच्या तुटवड्याने ३० हजार पशुधन वार्‍यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 06:26 PM2017-12-29T18:26:30+5:302017-12-29T18:26:55+5:30

पाथरी तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पशुपालकांना पशुवर उपचार करण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. लसीच्या तुटवड्याने तालुक्यातील तब्बल ३० हजार पशुधन मात्र वा-यावर आहे. 

In Pathri taluka, veterinary hospitals disperse 30 thousand livestock animals due to vaccines | पाथरी तालुक्यात पशु दवाखान्यांत लसीच्या तुटवड्याने ३० हजार पशुधन वार्‍यावर

पाथरी तालुक्यात पशु दवाखान्यांत लसीच्या तुटवड्याने ३० हजार पशुधन वार्‍यावर

googlenewsNext

पाथरी (परभणी) : तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पशुपालकांना पशुवर उपचार करण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. लसीच्या तुटवड्याने तालुक्यातील तब्बल ३० हजार पशुधन मात्र वा-यावर आहे. 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुका स्तरावर पशु वैद्यकीय दवाखाने आहेत. तालुक्यातील हदगाव बु., हदगाव खु., गुंज खु. आणि वाघाळा या ठिकाणी श्रेणी २ चे पशु वैद्यकीय दवाखाने आहेत. जिल्हा परिषदेमार्फत या दवाखान्यांना लसीचा पुरवठा केला जातो. पशुधनाला विविध आजार उद्भवू नयेत, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांच्या संख्येनुसार विविध लस व औषधींचा पुरवठा करण्यात येतो. जनावरांना घटसर्प, फर्‍या, लाळ, खुरकत या सोबतच शेळ्या, मेंढ्यासाठी इटीव्ही, पीटीआर या लसी उपाययोजना म्हणून देण्यात येतात. 

यावर्षी पशु वैद्यकीय दवाखान्याला कोणत्याच लसीचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे ६ ते ८ महिन्यापासून दवाखान्यात लस उपलब्ध नाही. जनावरांना लस उपलब्ध होत नसल्याने विविध आजार बळावत आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांवर उपचार करण्यासाठी खाजगी व्यवसायिकांकडे जावे लागत आहे. यामध्ये वेळ व पैसा दोन्ही खर्च करावे लागत आहेत. 

दरम्यान, गोदाकाठच्या जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये लाळ खुरकत या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण होते. यासाठी लाळखुरकत या लसीकरणाची आवश्यकता असते. परंतु आॅक्टोबर महिन्यात उपलब्ध होणारी लस अद्यापही जिल्हा पशु संवर्धन विभागाकडे उपलब्ध झालेली नाही. यामुळे पशुपालकातून चिंता व्यक्त केली जाते.

अधिकार्‍यांचे अपडाऊन
तालुक्यामध्ये जवळपास ३० हजार पशुधन आहेत. विविध आजार जडत असल्याने पशुपालकांना उपचारासाठी वैद्यकीय दवाखान्यात जावे लागते. परंतु अनेकवेळा पशु वैद्यकीय अधिकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध होत नाहीत. काही वैद्यकीय अधिकारी तर अपडाऊन करीत असल्याने सेवकांवरच दवाखान्याचा भार येत आहे. पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत सेवकच  जनावरांवर उपचार करीत आहेत. यामध्ये जनावरांच्या जीवाचा धोका निर्माण होत आहे. यामुळे पशुपालकांत संताप व्यक्त होत आहे.

तातडीने पुरवठा केला जाईल. 
जनावरांसाठी शासनाकडून लस मिळते. जूनपूर्वी काही लस उपलब्ध झाल्या होत्या. त्याचे वाटपही करण्यात आले होते. परंतु लाळ खुरकतची लस अद्यापही उपलब्ब्ध झाली नाही. लस उपलब्ध होताच तालुक्याला तातडीने पुरवठा केला जाईल. 
- डी.टी. वाघमारे, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी

पाठपुरावा केला जात आहे. 
जनावरांना दिल्या जाणार्‍या लसी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या जातात. तालुक्यात काही लस उपलब्ध झाल्या नाहीत. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. 
- भावनाताई नखाते,उपाध्यक्षा,जिल्हा परिषद

Web Title: In Pathri taluka, veterinary hospitals disperse 30 thousand livestock animals due to vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी