साई जन्मभूमीवर पाथरीकर ठाम; आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घेण्याची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:43 PM2020-01-21T13:43:10+5:302020-01-21T13:45:14+5:30
महाआरतीनंतर सर्वपक्षीय बैठकीतील सूर
पाथरी- साई जन्मभूमीच्या संदर्भात शासनाने आमचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, असा सूर पाथरी येथे मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडला. तत्पूर्वी दीड हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री सार्इंची महाआरती करण्यात आली.
श्री साई जन्मभूमी स्थळावरुन शिर्डीकरांनी वाद उपस्थित केल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डीतील शिष्टमंळाची बैठक झाली. त्यानंतर पाथरी येथील देवस्थानचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी १२ वाजता पाथरी येथील साई मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींसह जिल्हाभरातील सुमारे दीड हजारहून अधिक भाविक उपस्थित होते. या महाआरतीनंतर खा.बंडू जाधव, कृती समितीचे अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, माजी आ.विजय भांबळे, माजी आ.मोहन फड या नेत्यांसह जिल्हाभरातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाविकांच्या उपस्थितीत पाथरी येथे बैठक सुरु आहे. या बैठकीत शासनाने आमचे म्हणणे ऐकून न घेता निर्णय घेऊ नये. जन्मस्थळावर आम्ही ठाम आहोत, असा सूर उमटला.
यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले, साई जन्मभूमी म्हणूनच शासनाकडे आराखडा दाखल झाला असून त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. एखाद्या मुद्यावरुन वाद असेल तर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे, त्यानंतरच निर्णय घ्यावा.
आ.सुरेश वरपूडकर म्हणाले, साईबाबा जन्मस्थळाच्या विकासासाठीच आम्ही निधी मागितला. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली. शिर्डीकरांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जन्मभूमीचा मुद्दा बाजुला ठेवू, असे वक्तव्य केले आहे. त्यावर मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडू, असे वरपूडकर म्हणाले. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. एकंदर पाथरी येथील साई जन्मस्थळाच्या मुद्यावर सर्वजण ठाम असून जन्मस्थळ म्हणूनच पाथरी येथील साई मंदिराचा विकास करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बुधवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, विश्वस्त मंडळ आणि सर्वपक्षीय नेते बुधवारी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करावी अशी मागणीसुद्धा पाथरीकरांनी बैठकीत केली आहे. अशा आशयाचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.