२१ वाहनांच्या साहाय्याने शहरात घातली जातेय गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:33+5:302021-01-16T04:20:33+5:30
शहरातील विविध भागांमध्ये गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला ड्युटी नियुक्त करून दिली आहे. नानलपेठ, मोंढा आणि ...
शहरातील विविध भागांमध्ये गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला ड्युटी नियुक्त करून दिली आहे. नानलपेठ, मोंढा आणि कोतवाली या तीन पोलीस ठाण्यांची हद्द शहरी भागात येते. प्रत्येक पोलीस ठाण्याला तीन दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने दिली आहेत. दुचाकी वाहनांवर दोन कर्मचारी नियुक्त केले जातात. हे कर्मचारी शहराच्या हद्दीत गस्त घालतात. याशिवाय पोलीस ठाणे निहाय दोन चारचाकी वाहने असून, या वाहनांमधून रात्रीच्या वेळी गस्त घातली जाते. या वाहनावर पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शहरात गस्त घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहा अद्ययावत असे चारचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. या वाहनातही एक अधिकारी आणि दोन कर्मचारी नियुक्त केले जात असून, दिवसभर ही वाहने शहराच्या मुख्य रस्त्याने सायरन वाजवत गस्त घालतात. त्यामुळे शहरी भागात दुचाकी आणि चारचाकी २१ वाहनांच्या साहाय्याने गस्त घातली जात आहे.
जिल्ह्यात चोरीच्या ६०२ घटना
मागील वर्षी जिल्ह्यात चोरीच्या ६०२ घटना घडल्या आहेत, तर जबरी चोरीच्या ३८ आणि दरोड्याच्या चार घटनांचा समावेश आहे. चोरीच्या या घटनांपैकी बहुतांश प्रकार हे शहरी भागातील आहेत. पोलिसांची गस्त असली तरी अनेक वेळा चोरीच्या घटना टळल्या नाहीत. पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनांमधून गस्त धातली जाते. मात्र, रात्री संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरण्यासाठी या दोन वाहनांचा बराचसा वेळ खर्ची जातो. त्यामुळे पोलीस ठाण्यांना गस्तीसाठी आणखी वाहने वाढवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय काही ठाण्यांमध्ये मनुष्यबळही कमी आहे.
एमआयडीसी, हडको, साखला प्लॉट भागावर लक्ष
शहरी भागामध्ये चोऱ्यांचे अधिक प्रमाण एमआयडीसी लगतच्या वसाहती, हडको परिसर, गंगाखेड रोडवरील साखला प्लॉट आणि जुना पेडगावरोड भागात अधिक आहे. त्यामुळे या भागातील चोऱ्यांच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त लावली जाते. मात्र, रात्रभरातून पोलीस वाहन एकदाच या मार्गाने जाते. त्यामुळे चोरांचेही फावत आहे. गस्तीवरील वाहन निघून गेल्यानंतर पहाटेच्या सुमारास चोऱ्या होण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवसा दुचाकीवरून आणि चारचाकी वाहनांद्वारे नियमित गस्त होत असल्याचे दिसून आले.
अद्ययावत वाहने पोलीस दलात दाखल
मागील महिन्यात जिल्हा पोलीस दलात सहा अद्ययावत चारचाकी वाहने पोलीस दलामध्ये दाखल झाली आहेत. ही वाहने मुख्य मार्गावरील गस्तीसाठी ठेवण्यात आली असून, जिंतूररोड, वसमतरोड आणि बाजारपेठ भागात सायरन वाजवत वाहनांची गस्त सुरू असते. या वाहनांमुळे दिवसा होणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांना बऱ्याचअंशी आळा बसला आहे.
पोलीस नियंत्रण कक्षातून ठेवले जाते नियंत्रण
शहरातील पेट्रोलिंगसाठी नेमलेल्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेचे नियंत्रण पोलीस नियंत्रण कक्षातून केले जाते. एखादे वाहन एकाच जागी उभे असेल तर वॉकीटॉकीवरून चालकाशी संपर्क साधत सूचना दिल्या जातात. तसेच वाहनाने किती फेऱ्या केल्या याावरही नियंत्रण कक्षामधून नियंत्रण ठेवले जाते आहे.