दंडाची रक्कम भरा; अन्यथा गुन्हे दाखल होणार; भरारी पथकांकडून ४२ वीजचोऱ्या उघडकीस
By ज्ञानेश्वर भाले | Published: April 28, 2023 04:53 PM2023-04-28T16:53:53+5:302023-04-28T16:54:41+5:30
अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई होणार
परभणी :महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या ११ भरारी पथकाने परभणी परिमंडलात तीन दिवस वीजचोरांविरुद्ध राबविलेल्या धडक मोहिमेत ४२ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. संदिग्ध असलेल्या १४० वीज मीटरची तपासणी या मोहिमेत करण्यात आली. या वीजचोरीप्रकरणी संबंधितांना वीजबिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात येणार असून दंडाच्या रकमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील ११ भरारी पथकांनी नांदेड परिमंडलात परभणी व नांदेड मंडळांतर्गत २४ ते २६ एप्रिल या कालावधीत नांदेड परिमंडलात विशेष वीजचोरीविरोधी मोहीम राबवली. यामध्ये १४० वीज मीटरची तपासणी करण्यात आली असता नांदेड मंडळात ५० तर परभणी मंडळात ४२ मीटरमध्ये वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले. संबंधित वीजचोरांना अनुमानित वीजबिल दंडाच्या रक्कमेची बिले देण्यात येणार आहेत. वीजचोरीच्या अनुमानित वीजबिल दंडाची रकमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनधिकृत विजेचा वापर करू नये
वीजचोरी पकडण्याची मोहीम या पुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.