कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या नाकात गहू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:24 AM2021-09-10T04:24:59+5:302021-09-10T04:24:59+5:30
लहान मुलांकडून अनेक वेळा विचित्र प्रकार घडतात. खेळत-खेळत काही तरी वेगळेच होऊन बसते. त्यात नाकामध्ये शेंगदाणा, मुरमुरा अडकणे, कानात ...
लहान मुलांकडून अनेक वेळा विचित्र प्रकार घडतात. खेळत-खेळत काही तरी वेगळेच होऊन बसते. त्यात नाकामध्ये शेंगदाणा, मुरमुरा अडकणे, कानात एखादी वस्तू अडकणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कान-नाक-घसा विभागात अशा रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यावर उपचारही केले जात आहेत.
मुले काय करतील, याचा नेमक नाही
लहान मुले खोडकर असतात. अनेक वेळा ती विचित्र असे प्रकार करून बसतात आणि मग पालकांच्या तारांबळ उडते.
जेवण करत करत खेळत असताना अनेक वेळा खाद्य पदार्थ नाकात जाणे, श्वसननलिकेत अडकण्याचे प्रकार होतात. तर काही वेळा खेळताना पेन्सिल, खोडरबर कानात टाकून जखमही करून घेतात.
अशी घ्या मुलांची काळजी
लहान मुलांवर पालकांनी सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना समजावून सांगितले पाहिजे. तसेच धारदार वस्तू अथवा शरीराला इजा होतील, अशा वस्तू त्यांच्या हातात देऊ नये.
लहानपणीच मुलांना विविध वस्तू वापरण्याचे तसेच खाद्य पदार्थांची माहिती दिल्यास ते त्या त्या वस्तू योग्य पद्धतीने हाताळण्यास शिकली.
३५ मुलांवर महिनाभरात उपचार
येथील जिल्हा रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात अशा पद्धतीने मुलांवर दररोज उपचार केले जातात. दररोज साधारणत: ३ ते ४ मुलांचे पालक ही तक्रार घेऊन येतात. तज्ज्ञांमार्फत उपचार करून कानात, नाकात अडकलेली वस्तू अथवा पदार्थ अलगद काढून पालकांना चिंतामुक्त केले जाते.
लहान मुलांकडून नाकात शेंगदाणा अडकविणे, मुरमुरा अडकविणे हे प्रकार कॉमन आहेत. खाताना देखील अनेक वेळा श्वसननलिकेत एखादा पदार्थ अडकण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. नाकातील अथवा कानातील अडकलेली वस्तू, पदार्थ ओपीडीमध्येच काढला जातो. मात्र श्वसननलिकेत एखादा पदार्थ अडकल्यास तो धोकादायक ठरू शकतो.
- डॉ. तेजस तांबोळी, ईएनटीतज्ज्ञ