तहसीलच्या प्रांगणात वाहने लावल्यास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:21+5:302021-01-01T04:12:21+5:30
गंगाखेड : येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वाहने उभी करणाऱ्यांकडून पाचशे रुपयांचा दंड आकारला जाईल, असा फलक या परिसरात लावल्याने ...
गंगाखेड : येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वाहने उभी करणाऱ्यांकडून पाचशे रुपयांचा दंड आकारला जाईल, असा फलक या परिसरात लावल्याने नागरिकांना आता वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्न पडला आहे.
विविध कामांच्या निमित्ताने शहरी आणि ग्रामीण भागातून नागरिक तहसील कार्यालयात येतात. वेगवेगळी आंदोलने, मागण्यांचे निवेदन, शेतीशी निगडीत वाद, प्रमाणपत्र काढणे, मुद्रांक शुल्क आकारलेल्या मुद्रांकांचे शपथपत्र घेणे यासह इतर कामांसाठी नागरिक तहसील कार्यालयामध्ये येतात. मात्र, तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वाहने उभी केल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल, असा फलक मुख्य प्रवेशद्वारावरच लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्न पडला आहे. तहसील प्रशासनाने या परिसरात वाहनतळाची व्यवस्था करावी तसेच त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.