पूर्णा पंचायत समितीत पेन्शन घोटाळा; अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून एक कोटी ८३ लाखांचा अपहार

By राजन मगरुळकर | Updated: January 8, 2025 18:13 IST2025-01-08T18:12:40+5:302025-01-08T18:13:01+5:30

पूर्णा पंचायत समितीतील प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा नोंद; दोन तत्कालीन गटविकास अधिकारी सहभागी

Pension scam in Purna Panchayat Samiti; Officers and employees embezzled Rs 1 crore 83 lakhs | पूर्णा पंचायत समितीत पेन्शन घोटाळा; अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून एक कोटी ८३ लाखांचा अपहार

पूर्णा पंचायत समितीत पेन्शन घोटाळा; अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून एक कोटी ८३ लाखांचा अपहार

परभणी : जिल्ह्यातील पूर्णा पंचायत समितीतील पेन्शन घोटाळा मागील काही महिन्यांपासून चर्चेत आला होता. या प्रकरणात चौकशीअंती अहवाल सादर केल्यानंतर प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्याचे आदेश जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. त्यानुसार सन २०२१ ते २०२३ कालावधीत घडलेल्या पेन्शन घोटाळ्यामध्ये एकूण नऊ जणांवर १ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आला.

पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयुरकुमार देविदास आंदेलवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. सन २०२१ ते २०२३ दरम्यान हा प्रकार पंचायत समितीमध्ये घडला. यामध्ये पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक लेखा विभागाचे एम. बी. भिसे, सहायक लेखा अधिकारी एस. के. पाठक, तत्कालीन गटविकास अधिकारी एस. के. वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जे. व्ही. मोडके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश नीळकंठ नावकीकर, जयश्री टेलरिंग, शेख अजहर शेख समद अशा नऊ जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमूद आरोपींनी शासकीय रकमेचा अपहार हा स्वतःच्या फायद्याकरिता व स्वतःच्या पदाचा गैरवापर करून मौल्यवान रोखे बनवून बिलाचे बनावटीकरण करून सदरची रक्कम ही शासकीय असल्याचे माहीत असतानासुद्धा अपहार करून फसवणूक केली व संगनमताने गैरवापर केला. यामध्ये १ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात नमूद नमूद नऊ जणांविरूद्ध कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ३४ आयपीसीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विलास गोबाडे तपास करीत आहेत.

लोकमतने वेळोवेळी मांडले होते प्रकरण
पूर्णा पंचायत समितीतील पेन्शन घोटाळ्याचे प्रकरण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आले होते. यानंतर वेळोवेळी लोकमतने याबाबत वृत्त मांडले होते. या प्रकरणात जि. प.च्या मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा अहवालही सादर करण्यात आला होता. मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले होते. मात्र, यात गुन्हा कधी दाखल होणार ? असा प्रश्न होता. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथूर यांनी गुन्हा नोंदविण्याचा आदेश संबंधित यंत्रणेला दिला होता. त्यानुसार हा गुन्हा नोंद झाला.

दोन तत्कालीन गटविकास अधिकारी सहभागी
या प्रकरणात पूर्णा पंचायत समितीतील दोन तत्कालीन गटविकास अधिकारी सहभागी आहेत. एस. के. वानखेडे आणि जे. व्ही. मोडके यांच्यासह सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती एस. के. पाठक आणि पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक लेखा विभागाचे एम. बी. भिसे यांचा समावेश आहे तर अन्य आरोपींच्या नावे बनावट बिल सादर करून या शासकीय रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा गुन्हा आहे.

Web Title: Pension scam in Purna Panchayat Samiti; Officers and employees embezzled Rs 1 crore 83 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.