परभणी जिल्ह्यात तांत्रिक बिघाडामुळे साडेदहा हजार निवृत्तांचे वेतन रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 10:59 AM2017-12-07T10:59:36+5:302017-12-07T11:15:18+5:30
महिन्याच्या १ तारखेला मिळणारे वेतन ६ तारीख उलटली तरी खात्यात जमा न झाल्याने जिल्ह्यातील साडेदहा हजार सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांची ससेहोलपट सुरू झाली आहे.
परभणी : महिन्याच्या १ तारखेला मिळणारे वेतन ६ तारीख उलटली तरी खात्यात जमा न झाल्याने जिल्ह्यातील साडेदहा हजार सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांची ससेहोलपट सुरू झाली आहे़ दररोज घरापासून ते बँकेपर्यंतचा वाहतुकीचा खर्च आणि बँकेतील ताण या सेवानिवृत्तांना सहन करावा लागत आहे़ मागील आठवडाभरापासून निर्माण झालेली ही परिस्थिती बुधवारी देखील कायम असल्याने सेवानिवृत्तांमधून संताप व्यक्त होत आहे़
शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे निवृत्ती वेतन जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयामार्फत अदा केले जाते़ नियमानुसार आणि आजपर्यंतच्या अनुभवानुसार प्रत्येक महिन्याच्या ३० तारखेलाच त्या महिन्याचे वेतन सेवानिवृत्तांच्या खात्यावर जमा होते़ हे वेतन एटीएम कार्डच्या माध्यमातूनही काढता येते़ परंतु, जिल्ह्यातील अनेक सेवानिवृत्तांना एटीएमचा वापर करणे अवघड जात असल्याने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आणि पुढील महिन्याच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या दारासमोर सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी रांगा लागतात़ कोणी स्वत:हून रिक्षा करून बँकेत येतात तर काही सेवानिवृत्तांना त्यांचे कुटूंबिय रांगेत उभे राहण्यासाठी बँकेपर्यंत आणून सोडतात़
परभणी शहरातील जुन्या हैदराबाद बँकेतून बहुतांश सेवानिवृत्त कर्मचा-यांचे वेतन अदा केले जाते़ त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे वेतन घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सेवानिवृत्तांनी ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी गर्दी केली; परंतु, खात्यावर पैसे जमा नसल्याने कर्मचा-यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले़ १ तारेखपासून निर्माण झालेली ही परिस्थिती आठवडा संपत आला तरी कायम आहे़ त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचा-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बँक कार्यालयात दररोज सेवानिवृत्तांच्या चकरा होत असून, वेतन नसल्याने या कर्मचा-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे़ अनेक सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबाची गुजरान सेवानिवृत्ती वेतनावरच होते़ अनेकांचा औषधींचा खर्चही या रकमेतून भागविला जातो़ मात्र या सेवानिवृत्तांना वेळेत रक्कम मिळाली नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे़
सेवानिवृत्तांंच्या चकरा
शहरातील अनेक सेवानिवृत्तीधारकांनी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातही चकरा मारून निवृत्ती वेतनाची विचारणा केली़ या कार्यालयातील फोन दिवसभर खणखणत होते़ मात्र प्रत्येक फोनला निवृत्ती वेतन जमा झाले नसल्याची माहिती दिली जात होती़ त्यामुळे बँकेबरोबरच कोषागार कार्यालयातही सेवानिवृत्त धारकांची गर्दी पहावयास मिळाली़
१५ कोटी रुपयांचे सेवानिवृत्ती वेतन
परभणी जिल्ह्यात १० हजार ७३५ सेवानिवृत्तीधारक असून, या कर्मचा-यांच्या निवृत्ती वेतनापोटी १५ कोटी ९ लाख ६२२ रुपयांची रक्कम नोव्हेंबर महिन्यात २९ तारखेलाच जिल्हा कोषागार कार्यालयातून सीएमपीद्वारे अदा करण्यात आली आहे़ त्यामुळे ३० नोव्हेंबर रोजी ही रक्कम सेवानिवृत्तांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते़ परंतु, आजपर्यंत ती जमा झाली नाही़ त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
तांत्रिक बिघाड
जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातून सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या वेतनाची रक्कम हैदराबाद येथील कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) कडे जमा केली जाते़ या ठिकाणाहून ही रक्कम त्या त्या कर्मचा-यांच्या खात्यात जमा होते़ मात्र सीएमपीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जिल्ह्यातील सेवानिवृत्तांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्हास्तरावर कोणताही दोष नसताना जिल्ह्यातील सेवानिवृत्तांना मात्र त्यांचे वेतन मिळाले नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत़
येथे काहीच अडचण नाही
सेवानिवृत्तीधारकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला व्हावे, असे नियोजन केले आहे़ आजपर्यंत त्यानुसारच वेतन अदा झाले़ नोव्हेंबर महिन्यातील वेतनाची बिलेही वेळेच्या आत पाठविली आहेत़ त्यामुळे आमची कुठलीही अडचण नाही़ मात्र हैदराबाद येथील बँकेच्याच अडचणींमुळे वेतन जमा होण्यास वेळ लागत आहे़ वरिष्ठांशी या संदर्भात आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़
- शिवप्रकाश चन्ना, जिल्हा कोषागार अधिकारी
कॅश सेलकडे पाठपुरावा सुरु आहे
हैदराबाद येथील सीएमपीकडे प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला सेवानिवृत्तांची बिले पाठविली जातात़ सेवानिवृत्त धारकांची एकूण ८ बिले तयार होतात़ नोव्हेंबर महिन्यात ही बिले पाठविली़ मात्र हैदराबाद येथील तांत्रिक बिघाडामुळे निवृत्ती वेतन जमा झाले नाही़ हैदराबाद येथील कॅश प्रोसेसिंग सेलकडे आमचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे़ तसेच लेखा व कोषागार विभागाच्या संचालकांनाही या संदर्भातील माहिती दिली आहे़
- विनायक शिराळे, अप्पर कोषागार अधिकारी