जोखमीच्या तालुक्यात १०० टक्के तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:32+5:302021-07-02T04:13:32+5:30
परभणी : मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि जिंतूर या जोखमीच्या तालुक्यांमध्ये कुष्ठरोग व क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी ...
परभणी : मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि जिंतूर या जोखमीच्या तालुक्यांमध्ये कुष्ठरोग व क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या आहेत.
कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व संनियंत्रण मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा हिवताप अधिकारी व्ही. आर. पाटील, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम व जिंतूर हे तालुके अतिजोखमीचे असून, या पाचही तालुक्यांमध्ये १ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत रुग्ण शोध व सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे. त्याचप्रमाणे कमी जोखमीचे तालुके असलेल्या परभणी, पाथरी, सेलू व पूर्णा या तालुक्यात ३१ मार्चपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व गावे आणि शहरी भागातील स्लम एरियामध्ये आशा, महिला स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. संशयित कुष्ठरोग व क्षयरुग्ण आढळल्यास त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ उपचार सुरू केले जाणार आहेत. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मोहिमेचा आढावा घेतला. जोखमीच्या तालुक्यांमध्ये वेळेत मोहीम पूर्ण करून रुग्णांची तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.