एक फोन येतो, सोन्याचे आमिष दिले जाते आणि पुन्हा एकजण लाखो रुपयांना गंडतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 03:33 PM2021-03-17T15:33:36+5:302021-03-17T15:33:59+5:30
एका फोन कॉलवर विश्वास ठेवून अनेकजण स्वस्तातील सोने मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत आहेत.
सोनपेठः मागील काही दिवसांपासून सोन्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. मंगळवारी ( दि. 16 ) गंगाखेड तालुक्यातील दत्तवाडी येथे गडचिरोली येथील एकास गंडवल्याची घटना घडली आहे. आरोपींनी त्याच्याकडून रोख १ लाख ४० हजार रुपये आणि मोबाईल काढून घेत पलायन केले. एका फोन कॉलवर विश्वास ठेवून अनेकजण स्वस्तातील सोने मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. विशेष म्हणजे अशा घटना मोठ्याप्रमाणावर होत असतानाही अनेकजण यात अलगद अडकत असल्याचे दिसून येत आहे/
याबाबत अधिक माहिती अशी की, गोकुळ नगर गडचिरोली येथील बाबुराव काटवे यांच्या नातेवाईकांना निनावी नंबरवरून पंधरा दिवसांपूर्वी फोन आला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, परभणीतून बोलत असून सहा-सात किलो सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यापैकी एक किलो सोने जर तुम्ही विकून दिले तर तुम्हाला पन्नास ग्रॅम सोने देतो. नातेवाईकांनी याची माहिती काटवे यांना दिली. यानंतर काटवे यांनी त्या नंबरवर पुन्हा कॉल केला आणि सोन्याबाबत विचारणा केली. त्याने ३० हजार रुपये तोळा सोने असून माझे एक किलो सोने तुम्ही विकून दिल्यास तुम्हाला पन्नास ग्रॅम सोने देतो असे समोरच्याने सांगितले. खात्री पटल्याने बाबुराव काटवे सोमवारी ( दि. 15 ) सकाळी ७ वाजता एकास सोबत घेऊन चारचाकीने ( MH-33 V4731) परभणीकडे सोन्याचा व्यवहार करण्यासाठी निघाले. मात्र, आरोपींनी त्यांना नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे येण्यास सांगितले. येथून गंगाखेडमधील दत्तवाडी येथे बोलावले.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान ते गंगाखेडच्या दत्तवाडी शिवारात पोहचले. त्या ठिकाणी दोन माणसे व दोन महिला उभ्या होत्या. आरोपींनी काटवे यांना पैसे दाखविण्यास सांगितले. यावर काटवे यांनी आधी सोने पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी एका महिलेने त्यांना सोने दाखवले. ते बनावट असल्याचे काटवे यांनी लागलीच ओळखले आणि व्यवहारास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपींनी काटवे आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाईकास मारहाण केली आणि गाडीतील १ लाख ४० हजार रुपये व मोबाईल काढून घेतले. यानंतर काटवे यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि श्रीनिवास भिकाणे हे करत आहेत.