भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 01:36 PM2022-01-13T13:36:38+5:302022-01-13T13:41:17+5:30
थोरल्यानेच धाकट्या भावाचा खून केल्याचे नांदापूर येथील घटनेत झाले उघड
परभणी : घरात अचानक पडल्याने भावाचा मृत्यू झाल्याची खबर पोलिसांना देणाऱ्या थोरल्या भावानेच धाकट्या भावाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आरोपी भावास पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील नांदापूर येथील संदीपान शिवाजीराव रसाळ (२७) या युवकाचा ९ जानेवारी रोजी रात्री ९.५० ते १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी संदीपान याचा भाऊ सुखदेव शिवाजीराव रसाळ याने ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली होती. घरातच पडून संदीपानचा मृत्यू झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. त्यावरून १० जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात ११ जानेवारी रोजी मयत संदीपानचे काका अमृत आश्रोबा रसाळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. अज्ञात आरोपीने केलेल्या मारहाणीत संदीपानचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या तपासासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए.एन. आदोडे, उपनिरीक्षक संजय गिते, कर्मचारी आसाराम दवंडे, संजय आचार्य, सूर्यकांत फड आदींनी नांदापूर गाठले. तपासात भाऊ सुखदेव रसाळ यानेच संदीपान याचा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. केवळ बारा तासांतच पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. दरम्यान, आरोपी सुखदेव रसाळ यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए.एन. आदोडे तपास करीत आहेत.