कौशल्य विकास खेड्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:28+5:302021-07-19T04:13:28+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १८ जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या सूचना केल्या. बैठकीस खा. बंडू ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १८ जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या सूचना केल्या. बैठकीस खा. बंडू जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना आदींची उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, जिल्ह्यातील विविध विभागांनी कोविड परिस्थितीचा विचार करता उत्तम काम करून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण देऊन यासाठी राखीव असणारा निधी वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत जिल्ह्यातील बाजार समित्यांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.
बाजार समित्यांची सरासरी उलाढाल आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा विचार करत सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीनिहाय अहवाल ८ दिवसांत सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. जम्बो कोविड सेंटर, कंत्राटी व नियमित कर्मचारी, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि उपलब्ध निधी याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
विविध विभागांचा घेतला आढावा
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या बैठकीत नियोजन, जीएसटी, राज्य उत्पादन शुल्क, कृषी, कौशल्य विकास, पणन आदी विविध विभागांचा धावता आढावा घेतला.
जिल्ह्यातील पर्जन्यमान, कोविड परिस्थितीचे नियोजन, मृत्यूदर, ऑक्सिजनच्या खाटा, लसीकरण, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बैठकीत माहिती दिली.