परभणी जिल्ह्यात २५ लाख वृक्षांचे झाले रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:54 AM2018-07-25T00:54:29+5:302018-07-25T00:55:46+5:30
महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.
राज्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात दोन वर्षात जवळपास ६ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. काही ठिकाणी वृक्षांचे संगोपन झाले. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी गतवर्षीच्याच वृक्ष रोपणाच्या जागेवरच यावर्षीचे वृक्षारोपण केले आहे.
राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत देण्यात आलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील ४८ विभागांना पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात २५ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेला १ लाख ६५ हजार ४२५ वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९८ हजार १०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
कृषी विभागाला १ लाख ८४ हजार १८५ रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत २ लाख २२ हजारांचे वृक्ष लागवड केले आहेत. गृह विभागाला ५ हजार १५ झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार १००, औद्योगिक संस्थांना ३८ हजार २१५ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५ हजार ६०० झाडांचे रोपण करण्यात आले आहे. अन्य ४८ विभागांना ३४ लाख १५ हजार ७६४ वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.