प्लॅटफाॅर्म तिकीट आता 30 रुपये; रेल्वे स्थानकावर गर्दी मात्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:27+5:302021-03-13T04:31:27+5:30
रेल्वेमध्ये आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश आहे. असे असताना प्रवाशांचे अनेक नातेवाईक तसेच इतरही व्यक्तींचा सातत्याने रेल्वेस्थानकावर वावर वाढला आहे. ...
रेल्वेमध्ये आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश आहे. असे असताना प्रवाशांचे अनेक नातेवाईक तसेच इतरही व्यक्तींचा सातत्याने रेल्वेस्थानकावर वावर वाढला आहे. याबाबीला प्रतिबंध व्हावा, या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासनाने पूर्वी १०रुपये असलेले प्लॅटफॉर्म तिकीट आता ३० रुपये केले आहे. असे असले तरी रेल्वेस्थानकावरील व्यक्तींची संख्या मात्र कमी झालेली नाही. स्थानकावर प्रवाशांसह इतर व्यक्तींची गर्दी दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असे असताना येथे मात्र या नियमांचे पालन होत नाही. विशेष म्हणजे या संदर्भात कारवाई करणारी यंत्रणाच सक्रिय नसल्याने प्रवाशांसह अन्य व्यक्ती निसंकोचपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अनेक जण मास्कचा वापरही करीत नाहीत. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास स्थानकास भेट दिली असता नांदेडहून आलेल्या पवनेल एक्सप्रेसच्या वेळीे मोठ्या प्रमाणात प्रवाशी स्थानावर दिसून आले. अनेकांनी मास्कही लावला नव्हता. त्यामुळे येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आले.
सध्या दररोज ४८ रेल्वे धावतात
परभणी रेल्वेस्थानकावरुन दररोज २४ रेल्वे जातात. तर २४ रेल्वे येतात. यामध्ये देवगिरी एक्सप्रेस, सचखंड एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, राजाराणी एक्सप्रेस, बेंगलोर एक्सप्रेस, मनमाड एक्सप्रेस, ओखा एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
दररोज २ हजार प्रवासी करतात प्रवास
परभणी येथून नांदेड, गंगाखेड, परळी, औरंगाबाद, मुंबई, पुणे, लातूर, हैदराबाद , तिरुपती आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी जातात. दररोज जवळपास २ हजार प्रवासी सद्यस्थितीत येथून प्रवास करतात. कोरोनापूर्वी ही संख्या १० हजारांच्या घरात होती.
कारवाईकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
रेल्वे स्थानकावर तर नियमांचे उल्लंघन होतेच. शिवाय रेल्वेमध्येही अनेक प्रवासी मास्कचा वापर करीत नाहीत. विशेष म्हणजे रेल्वेचे कर्मचारीही मास्क वापरत नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करण्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.