जनावरे चोरणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:04+5:302021-07-22T04:13:04+5:30
जिल्ह्यात मागील वर्षभरापासून जनावरे चोरण्याचे प्रकार वाढले होते. शेतशिवारातील आखाड्यांवर बांधलेले जनावरे चोरून नेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे ...
जिल्ह्यात मागील वर्षभरापासून जनावरे चोरण्याचे प्रकार वाढले होते. शेतशिवारातील आखाड्यांवर बांधलेले जनावरे चोरून नेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. विविध पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हेही नोंद झाले आहेत.
दरम्यान, परभणी शहर आणि परिसरात जनावरांची चोरी करण्यासाठी काही जण रेकी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार आणि कर्मचाऱ्यांनी २० जुलै रोजी सायंकाळी धर्मापुरी रस्त्यावर कारवाई केली. तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे जनावरांच्या चोऱ्यांबाबत विचारपूस केली, तेव्हा अनेक ठिकाणी बैल, गाय चोरी केल्याचे आरोपींनी कबूल केले. चोरी केलेली जनावरे वांगी रोड येथील एका व्यक्तीस विक्री केल्याचेही आरोपींनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी प्रसाद शेषराव देवरे, गोपाल रंगनाथ देवरे, हर्षवर्धन प्रकाश कसबे (सर्व रा. थोरवा, ता. वसमत, जि. हिंगोली) यांना ताब्यात घेतले आहे. या तीनही आरोपींनी चोरलेली जनावरे शहरातील समीर अहमद महेबूब अहमद कुरेशी यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आरोपींकडून दोन लाख ८५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपींना पाथरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
नऊ गुन्हे उघड
जिल्ह्यात विविध भागात या आरोपींनी जनावरे चोरी केली आहेत. या प्रकरणी पाथरी, चुडावा, परभणी ग्रामीण, मानवत या पोलीस ठाण्यांमध्ये जनावरे चोरीचे नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्व गुन्हे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.