पोलिसांनी हद्द ओलांडली, तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:22 AM2021-09-07T04:22:57+5:302021-09-07T04:22:57+5:30
परभणी जिल्हा गृह विभागाच्या नियमानुसार व घडणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण लक्षात घेता संवेदनशील म्हणून गणला जातो. जिल्ह्यात ९ तालुक्यात मिळून ...
परभणी जिल्हा गृह विभागाच्या नियमानुसार व घडणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण लक्षात घेता संवेदनशील म्हणून गणला जातो. जिल्ह्यात ९ तालुक्यात मिळून एकूण १९ पोलीस स्टेशन आहेत. या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले जातात. तसेच येथून तपासही केला जातो. शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी दररोज किरकोळ हाणामारी, चोरी तसेच भांडणे, अपघात, खून असे प्रकार कुठे ना कुठे घडत असतात. या सर्व तक्रारींची दखल पोलिसांकडून घेतली जाते. मात्र, कधी कधी पोलिसांच्या समोर हद्दीचा प्रश्न निर्माण होतो. आणि यातून फिर्याद देण्यासाठी आलेल्या फिर्यादीला अनेक प्रश्न विचारुन पोलीस भंडावून सोडतात. यामुळे तक्रारदार तक्रार देण्यास धजावत नाहीत. असे अनेक प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.
जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे - १९
पोलीस अधिकारी - १३२
पोलीस कर्मचारी - १८५८
तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई
प्रत्यक्षात सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे. तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची असल्यास नंतर तो त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. मात्र तसे घडत नाही.
ही घ्या उदाहरणे
दुचाकी चोरी झाली
शहरातील कुठूनही दुचाकीची चोरी झाल्यास पोलीस स्थानकात गेल्यावर किमान २ दिवस फिर्यादीलाच सगळीकडे शोध घेऊन थांबण्यास सांगितले जाते. किमान २ ते ३ दिवस झाल्यावर मगच चोरी झाल्याची तक्रार घेतली जाते. असे प्रकार शहरातील ४ पोलीस ठाण्यात अनेकांबाबत दररोज घडले आहेत.