प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी तरुणीने रचलेला कट पोलिसांनी उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:27+5:302021-08-17T04:24:27+5:30
सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वच जण करतात. यात युवक, युवतींचे प्रमाण जास्त आहे. नवनवीन मित्र जोडणे, संवाद साधणे, त्यांच्याशी ...
सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वच जण करतात. यात युवक, युवतींचे प्रमाण जास्त आहे. नवनवीन मित्र जोडणे, संवाद साधणे, त्यांच्याशी विविध विषयांवर मत-मतांतरे मांडणे यासाठी सोशल मीडिया आजच्या काळात वरदान ठरत आहे. मात्र, याच्या वापराचे गैरफायदेही अनेक आहेत. असा एक प्रकार लाँकडाऊनच्या काळात जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
प्रकरणाची माहिती अशी, पश्चिम महाराष्ट्रातील विवेक (२९), शीतल (२७) (सर्वांचे नाव बदललेले) हे मित्र- मैत्रीण. हे पुण्यामध्ये खासगी नोकरी करण्यासाठी राहतात. यातील विवेकची अन्य एक मैत्रीण रश्मी (२८, रा.परभणी) (नाव बदललेले) हिच्याशी ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न जुळले होते. याची माहिती शीतलला झाली. शीतलची विवेकशी चांगली मैत्री होती. यातून शीतलला विवेकविषयी प्रेमभावना निर्माण झाल्या. मात्र, या प्रेमभावना त्याचे लग्न ठरेपर्यंत शीतलने व्यक्त केल्या नाहीत. यानंतर शीतलला विवेकने माझे लग्न रश्मीशी ठरल्याचे सांगितले. यानंतर शीतलने व्यक्त न केलेल्या प्रेमाचा व विवेकचे होत असलेले लग्न कसे मोडता येईल, याचा कट रचला. यासाठी शीतलने विवेकच्या इन्स्टाग्राम खात्यावर लग्न ठरलेल्या रश्मीचा बदनामीकारक मजकूर टाकला. हा मजकूर विवेक व त्याच्या नातेवाइकांनी, तसेच मित्र-मैत्रिणींनी पाहिला. यानंतर विवेकला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. त्याने सर्व मजकूर आणि रश्मीविषयी लिहिलेल्या बदनामीकारक बाबी रश्मीला सांगितल्या. त्यावरून रश्मी आवाक् झाली. कोणताही संदर्भ माहीत नसताना एखाद्या व्यक्तीने आपल्याविषयी असा मजकूर कसा टाकला याचा विचार तिने केला. त्यावेळी कोरोनाच्या लाॅकडाऊन कालावधीत ऑक्टोबरमध्ये हा प्रकार घडला. विशेष म्हणजे विवेक आणि रश्मी यांचा साखरपुडाही झालेला होता. त्यामुळे टाकण्यात आलेल्या मजकुरावरून विवेक, तसेच रश्मी यांच्या घरी तणावाचे वातावरण निर्माण झाले. घडलेला प्रकार रश्मीने परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे नमूद केला. यानंतर हे प्रकरण सायबर विभागाशी निगडित असल्याने पोलिसांनी ते सायबर सेलकडे वर्ग केले. सायबर सेलने संपूर्ण प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सोशल मीडियावर टाकलेल्या मजकुराची माहिती काढून प्रकरणाचा छडा लावला. विवेक, तसेच रश्मी यांच्याशी बोलून त्यांच्या सोशल मीडियावरील आकाउंट तपासले. यात मित्र-मैत्रिणी, तसेच अन्य ओळखीच्या माणसांशी चौकशी केली. यातून आरोपी हाताला लागला.
मैत्रिणीच निघाली आरोपी
महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांसोबत असलेले मित्र विवेक आणि शीतल हे पुण्यामध्ये खाजगी नोकरीनिमित्त अधून-मधून भेटत होते. त्यांच्यात नेहमी संवाद होत होता. यात भावी आयुष्यातील महत्त्वाचा असलेला लग्नाचा निर्णय घेतल्याचे विवेकने शीतलला सांगितले. यामध्ये विवेकला शीतलच्या एकतर्फी प्रेमाविषयी कोणतीही माहिती नव्हती, तसेच विवेकला शीतलविषयी केवळ मैत्रीची भावना होती. मात्र, या भावनेचा आदर करण्याऐवजी शीतलने विवेकचे लग्न मोडण्यासाठी रश्मीविषयीचा बदनामीकारण मजकूर इन्स्टाग्राम, तसेच फेसबुकवर शेअर केला. यानंतर पोलिसांना शीतलचे अकाउंट, तसेच विवेकचे बनविलेले खोटे अकाउंट आणि रश्मीविषयी टाकलेला मजकूर याचा थांगपत्ता तांत्रिक बाबी तपासल्यानंतर समोर आला. यातून शीतल ही आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.