मटका बुकीवर पोलिसांची धाड : तेवीस जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:17+5:302020-12-16T04:33:17+5:30
गंगाखेड शहरातील झोला पिंप्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बंद पडलेल्या जिनिंगमध्ये कल्याण व मिलन नावाच्या मटक्याचा जुगार खेळ खेळविला जात असल्याची ...
गंगाखेड शहरातील झोला पिंप्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बंद पडलेल्या जिनिंगमध्ये कल्याण व मिलन नावाच्या मटक्याचा जुगार खेळ खेळविला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन प्रो.पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस व विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, जमादार दीपक भारती, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, राहुल चिंचाणे, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, शंकर गायकवाड, फारुखी, विष्णू भिसे, दीपक मुदीराज आदींनी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास धाड टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून ९० हजार रुपये किंमतीची एक दुचाकी, सहा मोबाईल, मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या व रोख रकमेसह सुमारे २ लाख ६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना विश्वासात घेऊन मोबाईलच्या व्हॉटस ॲपवर मटक्याचे आकडे पाठविणाऱ्या एजंटांची नावे घेत विशेष पथकातील पोलीस शिपाई विष्णू बाळासाहेब भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सीताराम गवते, राजू मुंडे, रोहिदास राजुरे, बालाजी कौसे अशा एकूण २३ जणांविरुध्द गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार दीपक भारती, पो. ना. दीपककुमार व्हावळे करीत आहेत.