पोलिस भरती प्रक्रिया: ५८५ उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा; पहाटेपासून केंद्रावर विद्यार्थी दाखल
By राजन मगरुळकर | Published: April 2, 2023 03:11 PM2023-04-02T15:11:09+5:302023-04-02T15:11:47+5:30
जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली.
राजन मंगरुळकर, परभणी : जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा एकूण ५८५ उमेदवारांनी दिली. लेखी परीक्षा दिलेल्या भावी पोलिस उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
परभणी शहरातील जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयात सकाळी साडेआठ ते दहा या कालावधीत परीक्षा झाली. पोलिस शिपाई २०२१ अंतर्गत रिक्त असलेल्या ७५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या लेखी परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी केंद्रावर तपासणी आणि कागदपत्र, ओळखपत्र, प्रवेशपत्र तपासणीच्या प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते. पहाटे सहा वाजेपासून परीक्षार्थी केंद्रावर आल्याचे दिसून आले. यात लेखी परीक्षेसाठी एकूण एक हजार २५ उमेदवारांची यादी पोलिस विभागाने जाहीर केली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्याने व काही परीक्षार्थींनी दोन ठिकाणी मैदानी चाचणी दिल्याने अनेकांनी इतर जिल्ह्यातील लेखी परीक्षेला प्राधान्य दिले. परभणीतील परीक्षेसाठी एकूण ५८५ परीक्षार्थी हजर होते.
असे होते परीक्षार्थी
पुरुष -४८९
महिला -९६
एकूण उपस्थित -५८५.
एकूण जागा -७५
परीक्षा केंद्र एक
अनुपस्थित -४४०
शंभर मार्कांची परीक्षा
सदरील लेखी परीक्षा सकाळी साडेआठ ते दहा या कालावधीत पूर्ण झाली. शंभर मार्कांच्या लेखी परीक्षेसाठी दीड तासांचा अवधी उमेदवारांना देण्यात आला होता.
असा होता अधिकारी बंदोबस्त
परीक्षेसाठी जिल्हा पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा परीक्षा केंद्र परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये पोलिस अधीक्षक एक, अप्पर पोलिस अधीक्षक एक, उपविभागीय पोलिस अधिकारी चार, पोलिस अधिकारी ५०, अंमलदार १५०
५० इन कॅमेऱ्यांची नजर
ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे उमेदवारांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना केंद्रामध्ये सोडण्यात आले. ज्या हॉलमध्ये परीक्षा झाल्या तेथे सर्व परीक्षार्थी उमेदवारांवर एकूण ५० इन कॅमेऱ्यांची नजर होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"