बंधारा फोडण्यासाठी निघालेल्या आमदारांना पोलिसांनी अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:04+5:302021-04-25T04:17:04+5:30
गंगाखेड : येथील गोदावरी नदी पात्रात उभारण्यात आलेल्या कच्चा बंधाऱ्यातील अडवलेले पाणी खालील गावाला सोडण्यासाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निघालेले ...
गंगाखेड : येथील गोदावरी नदी पात्रात उभारण्यात आलेल्या कच्चा बंधाऱ्यातील अडवलेले पाणी खालील गावाला सोडण्यासाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निघालेले आमदार रत्नाकर गुट्टे यांना पोलिसांनी अडवून पाणी सोडण्यासाठी विरोध केला. त्यामुळे शुक्रवारी रात्री गंगाखेड शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला होता.
गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यान गोदावरी नदी पात्रात असलेल्या मातीच्या कच्च्या बंधाऱ्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी अडविले असून, हे पाणी गंगाखेड शहराच्या खालील बाजूने असलेल्या झोला, पिंपरी व मसला गावांसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी तहसील प्रशासन व आमदार रत्नाकर गुटे यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा मातीचा कच्चा बंधारा फोडून पाणी सोडण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र हे पाणी खाली गावांना सोडल्यानंतर गंगाखेड शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हे पाणी सोडण्यासाठी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया व बंधारा बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे शहरांमध्ये पाणीप्रश्न चांगलाच पेटला होता. त्यातच शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आमदार रत्नाकर गुट्टे व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी बंधारा फोडण्यासाठी नदीपात्रात धाव घेतली. मात्र त्याच वेळेस पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी पोलीस फौजफाटा सोबत घेत नदीपात्रात जाऊन बंधारा सोडण्यास विरोध केला. त्यामुळे नदीपात्रातील वातावरण चांगलेच तापले होते. या कच्चा बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त लावून दंगा नियंत्रण दलाची तुकडी ही यावेळी तैनात करण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. यावेळी शनिवारी यासंर्दभात बैठक आयोजित करण्याचा निर्यण घेण्यात आला. त्यानंतर येथील वाद शांत झाला.
बैठकीत शमला वाद
बंधाऱ्यातील पाणी सोडणे वरून निर्माण होत असलेल्या वादामुळे २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आमदार रत्नाकर गुट्टे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, उपमुख्य अधिकारी स्वाती वाकोडे, पाणीपुरवठा अभियंता मयुरी पाटील यांच्यासह बंधारा बचाव कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये सर्वांशी चर्चा करून या कच्च्या बंधाऱ्यातील शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी आरक्षित करून जास्तीचे पाणी खालील गावांना सोडण्यासाठी विनंती केली. त्यानंतर मातीच्या कच्च्या बंधाऱ्यात पाइप टाकून पाणी सोडण्याचे सर्वानुमते ठरविल्याने पेटलेल्या पाण्याचा वाद शनिवारी बैठकीनंतर शमला.