लाचेच्या रकमेसह पोलीस उपनिरीक्षक, शिपाई फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:53 PM2019-06-21T13:53:37+5:302019-06-21T13:57:39+5:30
जेसीबी मशीनवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच
गंगाखेड (जि. परभणी) : जेसीबी मशीनवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर एसीबीच्या जाळ्यात सापडल्याची चाहूल लागताच सोनपेठ येथील पोलीस उपनिरीक्षक आणि एक शिपाई लाचेच्या रकमेसह फरार झाल्याची घटना २० जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू उपसा करण्याच्या कामासाठी चालणाऱ्या जेसीबी मशीनवर कारवाई न करण्यासाठी सोनपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गिते व पोलीस शिपाई भालेराव हे पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. त्यावरुन या विभागाचे पोलीस उपाधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, जमादार हनुमंते, पोलीस नाईक अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, सचिन धबडगे, बोके आदींच्या पथकाने २० जून रोजी सायंकाळी गंगाखेड हद्दीतील परळी रस्त्यावर सापळा लावला. तक्रारदाराने दिलेली लाचेची रक्कम स्वीकारताच आपण एसीबीच्या जाळ्यात सापडल्याची चाहूल लागल्याने उपनिरीक्षक गिते व शिपाई भालेराव हे दोघेही लाचेची रक्कम घेऊन पसार झाले.
पोलीस दलात खळबळ
लाचेची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिते व शिपाई भालेराव यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पोलिसांवरच झालेल्या कारवाईने गंगाखेड व सोनपेठ तालुक्यातील पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.