ग्रामीण भागातील राजकारण ढवळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:43+5:302020-12-07T04:11:43+5:30
पाथरी : येत्या काही दिवसांत तालुक्यात होवू घातलेल्या ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेस अंतिम मान्यता मिळाली आहे. मंगळवारी ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय ...
पाथरी : येत्या काही दिवसांत तालुक्यात होवू घातलेल्या ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेस अंतिम मान्यता मिळाली आहे. मंगळवारी ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय प्रारुपयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रा. पं. निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे.
पाथरी तालुक्यात ४९ ग्रामपंचायती असून, ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका थेट सरपंच जनतेतून निवडून देण्याचा शासनाने निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदा सप्टेंबर २०१७ मध्ये पार पडल्या. त्यानंतर आता तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट २०२० या कालावधीत संपुष्टात आली. निवडणुकीसंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका रद्द करण्यात आल्या. आता अनलॉकमध्ये निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना व आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यादृष्टीने नववर्षाच्या प्रारंभी प्रशासकीय पातळीवर कार्यक्रम अंमलबजावणी सुरू झाली आहे तर दुसरीकडे राजकीय मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. ग्रामपंचायतीची प्रभागरचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगाने २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला. त्यानंतर सदस्य आरक्षण निश्चित करण्यात येऊन सरपंचपदाचे आरक्षणही काढण्यात आले. त्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करण्यात येऊन १ डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आल्या.
सोमवारपर्यंत हरकती, सूचना नोंदविता येणार
पाथरी तालुक्यातील निवडणूकपात्र असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यासंबंधी सोमवारी हरकती व सूचना दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदारयादी १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत लेखणीकांच्या काही चुका असतील, दुसऱ्या प्रभागात चुकून नाव अंतर्भूत झाले असेल तर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.