जिल्हा बँकेसाठी १५ केंद्रांवर आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:47+5:302021-03-21T04:16:47+5:30
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १४ जागांसाठी ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून ...
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १४ जागांसाठी ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागातील अर्थवाहिनी अशी ओळख असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. या बँकेच्या २१ संचालकांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी ७ संचालक यापूर्वीच बिनविरोध झाल्याने आता १४ जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे.
परभणी जिल्ह्यात ९ आणि हिंगोली जिल्ह्यात ५ केंद्रांवर मतदान होणार असून, ११५ कर्मचारी तसेच ५ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मतदानासाठी नियुक्ती केली आहे. मतदान केंद्राच्या परिसरांत जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर राखणे, मास्कचा वापर आदी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
२३ मार्च रोजी मतमोजणी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान झालेल्या सीलबंद मतपेट्या परभणी शहरातील कल्याण मंडपम येथे ठेवल्या जाणार आहेत. याच ठिकाणी २३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी ८ टेबलची व्यवस्था केली असून प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदार संघाची तालुकानिहाय मतमोजणी केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी ५४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
या केंद्रांवर मतदान
परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद कन्या प्रशाला, स्टेशन रोड, जि. प. प्रशाला बस स्टँडसमोर जिंतूर, जि.प. केंद्रीय शाळा सेलू, जि.प. शाळा, पाथरी, केंद्रीय जि.प. प्रा. शा. मानवत, जि.प. शाळा सोनपेठ, जि.प. शाळा गंगाखेड, जि.प. शाळा पालम आणि पूर्णा येथील जिल्हा परिषद हायस्कूल या ९ केंद्रांवर मतदान होईल. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात जि. प. शाळा, रिसाला बाजार हिंगोली, जि.प. प्रशाला नवीन इमारत खोली क्रमांक ६ सेनगाव, जि.प. प्रशाला औंढानागनाथ, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय वसमत खोली क्रमांक २ आणि कळमनुरी येथे जि.प. प्रशाला विकासनगर येथे मतदान होणार आहे.