६ कोटी रुपये खर्चुन तयार केलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:22 AM2021-09-07T04:22:55+5:302021-09-07T04:22:55+5:30

झरी ते दुधगाव, आसेगाव मार्गे औंढा नागनाथ या राज्यमार्गास राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली होती. त्यानंतर झरी ते ...

Poor condition of road constructed at a cost of Rs. 6 crore | ६ कोटी रुपये खर्चुन तयार केलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था

६ कोटी रुपये खर्चुन तयार केलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था

Next

झरी ते दुधगाव, आसेगाव मार्गे औंढा नागनाथ या राज्यमार्गास राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली होती. त्यानंतर झरी ते आसेगाव फाटा या दरम्यानच्या १२ किलो मीटर रस्त्याच्या कामासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. परभणी मनपाचे तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी ज्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले होते, त्याच कंत्राटदारास या रस्त्याचे काम मिळाले. या कंत्राटदाराने सद्य:स्थितीत झरी ते दुधगाव फाटा या पहिल्या टप्प्यातील ५ किलोमीटरचे काम ४ महिन्यांपूर्वीच पूर्ण केले आहे. उर्वरित काम बाकी असताना काम केलेल्या ५ किलोमीटर रस्त्यावर काही ठिकाणी मोठ्याप्रमाणात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर तयार केलेल्या एका पुलाची एक बाजू कोसळली आहे. या रस्त्यावरून साडेगाव, टाकळी बोबडे, उखळी, पिंगळी, सावंगी, वाडी, मिर्झापूर, जोड परळी आदी गावांतील ग्रामस्थांची ये-जा असते. आता या रस्त्यावर भेगा पडल्याने या भागातील ग्रामस्थांना रस्त्यावरून रहदारी करणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची ही अवस्था झाली आहे. या रस्त्याचे पुढील काम अद्याप बाकी आहे. हा कंत्राटदार जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या नियमित संपर्कातील आहे. त्यामुळे पुढील कामही या कंत्राटदाराकडून कसे होईल, याबाबत ग्रामस्थांमधून भीती व्यक्त केली जात आहे. या कंत्राटदरावर कारवाई करावी, अशी मागणी साडेगाव येथील श्रीकांत देवडे यांनी केली आहे.

Web Title: Poor condition of road constructed at a cost of Rs. 6 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.