शेळगाव ते भिसेगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:18+5:302021-01-24T04:08:18+5:30
सोनपेठ तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असून, रस्त्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. तालुक्यातील नागरिकांना गंगाखेड, परभणी व नांदेडला जाण्यासाठी अत्यंत ...
सोनपेठ तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असून, रस्त्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. तालुक्यातील नागरिकांना गंगाखेड, परभणी व नांदेडला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा सोनपेठ - शेळगाव - गंगाखेड या रस्त्यावरील शेळगाव ते भिसेगाव या १२ किमी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून मोठे वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे दुचाकीचालकांनाही या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. सायखेड ते खडकापर्यंत रस्त्यावर अनेक दिवसांपासून खडी अंथरलेली आहे. परंतु त्यावर डांबरीकरण न झाल्याने त्याचाही त्रास वाहनधारकांना होत आहे. सोनपेठ व गंगाखेड या दोन तालुक्यांना जोडणारा हा मार्ग असून या मार्गावरील शेळगाव ते भिसेगाव या १२ किमी अंतरावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना नाकीनव येतात. दोन तालुक्यांना जोडणारा हा मार्ग असल्याने या मार्गावर २४ तास वाहतूक सुरू असते. तसेच या मार्गावर अनेक गावांना जोडणाऱ्या सायखेड, देवीनगर, मुन्शीराम तांडा, खडका, कान्हेगाव ही मोठी गावे आहेत. या मार्गावरून नागरिक, विद्यार्थी व वयोवृद्ध माणसांना तालुक्याला जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.