जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:06+5:302021-06-20T04:14:06+5:30
परभणी : मागील आठवड्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षाही कमी आल्याने पुढील आठवड्यात निर्बंध आणखी सैल केले जाण्याची ...
परभणी : मागील आठवड्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षाही कमी आल्याने पुढील आठवड्यात निर्बंध आणखी सैल केले जाण्याची शक्यता आहे.
राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन व्याप्त खाटांच्या संख्येचा आधार घेऊन अनलॉकचे पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा परभणी जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होता. त्यानंतरच्या ४ ते १० जून या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३ टक्क्यांवर पोहोचल्याने मागील आठवड्यात जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात होऊन सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमित झाले आहेत; मात्र काही निर्बंध अद्यापही आहेत. कोरोना संसर्ग आता आटोक्यात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील व्यवहारासंदर्भात प्रशासनाला निर्णय घ्यावयाचा आहे. ११ ते १८ जून या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि एकूण तपासण्या लक्षात घेता जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्के झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी पेक्षाही हा पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याने येत्या सोमवारपासून जिल्ह्यात आणखी निर्बंध कमी केले जाण्याची शक्यता आहे.
११ ते १८ जून या काळात प्रशासनाने २८ हजार ८०२ नागरिकांचे अहवाल तपासले. यामध्ये २४१ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ही बाब जिल्ह्याला दिलासा देणारी आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात आणखी कोणत्या कोणत्या व्यवहारांना सवलत मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या सेवा होऊ शकतात सुरू
मागील आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश सेवा प्रशासनाने सुरू केल्या आहेत; मात्र धार्मिक स्थळे, महाविद्यालय, शाळा, शिकवणी वर्ग, आठवडी बाजार, उद्याने, जलतरण तलाव सुरू करण्यास परवानगी नाही. त्याचप्रमाणे लग्नकार्यासाठी केवळ शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने या सेवांपैकी कोणती सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते, याकडे लक्ष लागले आहे. त्यातही आठवडी बाजार, लग्नकार्यातील नागरिकांच्या उपस्थिती विषयी सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे.
पथकांना सतर्क करण्याची गरज
पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने जिल्ह्यात एकीकडे निर्बंध कमी केले जात असले तरी नागरिकांकडून मात्र प्रतिबंधक नियमांचे पालन होत नाही. बाजारपेठ, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाच्या पथकांकडून कडक अंमलबजावणी झाली तर संभाव्य धोका टळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने पथकांना सतर्क ठेवणे गरजेचे झाले आहे.
मागील आठवड्यातील तपासण्या व रुग्ण
११जून ३१४९ ३३
१२ जून ३९५७ २१
१३ जून २५७० २५
१४ जून ३४३१ ३०
१५ जून ५३७६ ३४
१६ जून २८०६ २१
१७ जून ३२७७ १८
१८ जून ४२३६ ४९