परभणी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद; निरिक्षण विहिरींच्या पाणी पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:56 AM2017-12-12T00:56:45+5:302017-12-12T00:57:59+5:30
जिल्ह्यातील ८४ निरिक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी भूजल सर्व्हेक्षण विभागाने घेतल्या असून, त्यापैकी २० विहिरींची पाणीपातळी ही सरासरी पातळीपेक्षा खोल गेल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अहवाल या विभागाने जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ८४ निरिक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी भूजल सर्व्हेक्षण विभागाने घेतल्या असून, त्यापैकी २० विहिरींची पाणीपातळी ही सरासरी पातळीपेक्षा खोल गेल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अहवाल या विभागाने जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.
परभणी येथील भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने सप्टेंबर, आॅक्टोबर, जानेवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्याची भूजल पातळी नोंद केली जाते. भूजल पातळी मोजण्यासाठी या विभागाने वेगवेगळ्या भागात ८४ निरिक्षण विहिरी तयार केल्या आहेत. या विहिरींची ठराविक खोली असून प्रत्येक वेळी विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेतली जाते. त्यावरुन भूजल पातळीचा अंदाजही बांधला जातो. दरवर्षी जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाºया नोंदीवर आधारित जिल्ह्यातील पाणी टंचाईचा अंदाज बांधला जातो. मात्र यावर्षी शासनाने आॅक्टोबर महिन्यातच घेतलेल्या नोंदीवरच संभाव्य टंचाईची गावे जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यावरुन जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात ८४ निरिक्षण विहिरी असून या विहिरींपैकी परभणी तालुक्यातील ४, पूर्णा तालुक्यातील ३, सेलू ४, गंगाखेड ५, पालम २, सोनपेठ ३ आणि जिंतूर तालुक्यातील एका निरिक्षण विहिरीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. एकूण २० विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याने परिसरातील गावांमध्ये आगामी काळात टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पूर्णा तालुक्यात घटली पातळी
गावनिहाय निरिक्षण विहिरींच्या नोंदीत केवळ २० विहिरींची पाणीपातळी घटली असून, पूर्णा तालुक्यात मात्र सरासरी भूजल पातळीत घट झाली आहे. २०१२ ते २०१६ या पाच वर्षात आॅक्टोबर महिन्यामध्ये पूर्णा तालुक्यात ४.५८ मि.मी. भूजल पातळीची खोली असते. मात्र यावर्षी भूजल पातळी ४.७० मि.मी.वर पोहचली आहे. त्यामुळे भूजल पातळीत ०.१२ मीटरची घट झाली आहे. इतर तालुक्यात मात्र सरासरी भूजल पातळी घटली नसली तरी निरिक्षण विहिरींची पातळी मात्र घटली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईचे संकट भेडसावण्याची शक्यता आहे.
भूजल पातळीत आणखी घट होण्याची शक्यता
आॅक्टोबर महिन्यात २० निरिक्षण विहिरींच्या भूजलपातळीत घट झाली आहे. आता पावसाळा उरकला असून पाण्याचे स्त्रोत आटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे दिवसेंदिवस जिल्ह्याच्या भूजलपातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने ४१० संभाव्य गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर केली आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या उपाययोजनांसाठी निधी मागविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी जि.प.कडून टंचाई कृती आराखडे मागविले आहेत. मात्र अद्याप हे आराखडे दाखल झाले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.
या गावात घटली भूजल पातळी
परभणी तालुक्यात मुरुंबा येथील भूजल पातळी ०.७६ मीटरने घटली आहे. असोला येथील भूजल पातळी ६.७३ मीटरने घटली आहे. नांदगाव बु. येथील भूजल पातळीत ८.९० मीटरची घट झाली आहे. तसेच बोरवंड बु. येथे २.१० मीटरची घट नोंदविण्यात आली. पूर्णा तालुक्यात बलसा ०.१४, एकरुखा ७.६४, चुडावा ०.६६ मीटर भूजल पातळीत घट झाली आहे. सेलू तालुक्यात पिंपरी खु.०.९४, म्हाळसापूर ३.६६, रवळगाव ३.२०, चिकलठाणा १.६०, गंगाखेड तालुक्यात खळी ६.१२, गंगाखेड ०.४४, महातपुरी ०.०२, धनगरमोहा ०.७०, डोंगरगाव पिंपळा ०.३२, पालम तालुक्यात खरब धानोरा ०.४४, फरकंडा २.९४, सोनपेठ तालुक्यात शिर्शी बु. ०.४६, निळा ०.७२, खडका २.६२ तर जिंतूर तालुक्यात नागापूर येथील निरिक्षण विहिरीच्या भूजल पातळीत ०.३६ मीटरची घट झाली आहे.