आर्थिक अडचणीमुळे दहावीनंतरचे शिक्षण थांबले; तणावात मुलगी निघाली आत्महत्येसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:28 PM2022-06-20T17:28:17+5:302022-06-20T17:29:11+5:30
पोलिसांच्या सतर्कतेने विद्यार्थिनीचे वाचले प्राण
देवगावफाटा (जि. परभणी) : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक समस्येमुळे पुढील शिक्षणासाठी कुटुंबीयांचा विरोध असल्याने मानसिक तणावाखाली असलेली एक विद्यार्थिनी शनिवारी आत्महत्या करण्यासाठी सेलू येथील रेल्वेस्थानकावर दाखल झाली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने या विद्यार्थिनीला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सेलू येथील रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास नांदेडहून मनमाडकडे जाणारी डेम्यू रेल्वे स्थानकात दाखल झाल्यावर या रेल्वेजवळ एक मुलगी येरझारा घालत असल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास नाटकर, पोलीस कर्मचारी परसराम सूर्यवंशी यांच्या लक्षात आले. त्यांनी या मुलीला चौकीत आणून तिची विचारपूस केली. तेव्हा या मुलीने मानसिक तणावातून आत्महत्या करण्यासाठी स्थानकावर आल्याचे पोलिसांना सांगितले.
दहावी परीक्षेत ५८ टक्के गुण मिळाले. पुढे पोलीस दलात सेवा करण्याची इच्छा आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षणासाठी घरच्या मंडळींचा विरोध आहे. त्यातून मानसिक तणावातून आत्महत्या करण्यासाठी येथे आल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना स्थानकावर बोलावून घेतले. तसेच सेलूतील शिवसेनेचे माजी नगरसेवक मनीष कदम व इतर काहीजण त्या ठिकाणी आले. या सर्वांनी मुलीची समजूत काढली. पोलीस कर्मचारी नाटकर, सूर्यवंशी, मनीष कदम यांनी आर्थिक मदतीची तयारी दर्शवित मुलीचे शिक्षण सुरू ठेवा, असे आईला सांगितले. त्यानंतर शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास मुलीला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले.
कदम, नाटकर, सूर्यवंशी यांचा सत्कार
रेल्वे पोलीस कर्मचारी नाटकर आणि सूर्यवंशी यांच्या सतर्कतेमुळे या विद्यार्थिनीचे प्राण वाचले. तसेच माजी नगरसेवक मनीष कदम यांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे तिघांचाही सत्कार करण्यात आला. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी यावेळी बोलून दाखविली.