परीक्षा स्थगितीने ४ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:29+5:302021-03-13T04:31:29+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १४ मार्च रोजी विविध पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यातील १५ ...

Postponement of exams hangs the future of 4,000 students | परीक्षा स्थगितीने ४ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

परीक्षा स्थगितीने ४ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

Next

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १४ मार्च रोजी विविध पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यातील १५ केंद्रांवर ३ हजार ९१२ उमेदवार ही परीक्षा देणार होते. प्रशासनाच्या वतीने या परीक्षेची तयारी करण्यात आली होती. अनेक दिवसानंतर परीक्षा होत असल्याने उमेदवारांनीही या संदर्भात पुरेपूर तयारी केली आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यावरून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचा आदेश लोकसेवा आयोगाच्या वतीने ११ मार्च रोजी काढण्यात आला. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ शकते. मग राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा का होऊ शकत नाही? विविध कारणांची चौथ्यांदा ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. अनेक उमेदवारांच्या वयाची मुदत संपत आली आहे. अशात ही परीक्षा स्थगित करणे दुदैवी असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

परीक्षेसाठी हॉल तिकीट केले वितरित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. या अनुषंगाने अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना लोकसेवा आयोगाच्या वतीने हॉल तिकीटही पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर या अनुषंगाने ३ हजार ९१२ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आता ही परीक्षा स्थगित करण्यात आल्याने उमेदवार नाराज आहेत.

लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय दर्दैवी आहे. यापूर्वीही पाच वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाच्या नियमांचे पालन करून ही परीक्षा घेता आली असती. या निर्णयामुळे उमेदवारांचे मानसिक खच्चीकरण होईल.

-गोविंद सुधाकर भिसे, परभणी

शासनाचा हा निर्णय चुकीचा आहे. यामुळे या परीक्षेची अनेक महिन्यांपासून तयारी करणाऱ्या उमेदवारांचे खच्चीकरण होईल. याची शासन भरपाई करु शकणार नाही. केंद्र सरकारच्या धर्तीवर परीक्षचे नियोजन करावे.

-कमलाकर सुदेवाड, टाकळी कुंभकर्ण

परीक्षेची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. ही परीक्षा रद्द झाल्याने निराश झालो आहे. आतापर्यंत दर महिन्याला परीक्षेच्या तयारीसाठी ५ हजार रुपयांचा खर्च करावा लागत होता. आता पुन्हा सातत्य ठेवण्यासाठी घरच्यांना पैसे कसे मागावे, असा प्रश्न पडला आहे.

- अमोल भिसे, कोल्हावाडी

केंद्रीय लोकसेवा आयोग ज्या प्रमाणे वर्षभर ठरवून दिलेल्या परीक्षा वेळापत्रकाचे काटेकोर पालन करते. तसे राज्य लोकसेवा आयोगानेही नियोजन करावे. आम्ही तारीख डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला; पण अचानक स्थगिती आल्याने उदासीनता वाटत आहे.

-एकनाथ केदारी, चारठाणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना परीक्षा देण्यासंदर्भात मर्यादित संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही अनेक महिन्यांपासून परिश्रम घेतले. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र अभ्यास केला आहे. आता काही क्षणात ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केला नाही.

- वैष्णवी बन, सेलू

राज्यात विविध विभागात अधिकाऱ्यांनी असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून या परीक्षेचा अनेक महिन्यांपासून अभ्यास करीत आहे. १४ मार्चची तयारी पूर्ण केली आहे. अशातच अचानक स्थगिती देणे म्हणजे विद्यार्थ्यांची एक संधी हिरावून घेणे आहे.

- गणेश थोरे, धनेगाव-सेलू

Web Title: Postponement of exams hangs the future of 4,000 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.