अंदाजपत्रक नसताना एका दिवसात दिली वीज जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:43+5:302021-03-04T04:30:43+5:30
देवगाव फाटा : सेलू तालुक्यात १.३ अंतर्गत कामासाठी अनेकांचे कोटेशन व मंजुरी आदेश असतानाही ही कामे प्रलंबित आहेत. मात्र, ...
देवगाव फाटा : सेलू तालुक्यात १.३ अंतर्गत कामासाठी अनेकांचे कोटेशन व मंजुरी आदेश असतानाही ही कामे प्रलंबित आहेत. मात्र, अंदाजपत्रक व मंजुरी नसतानाही एकाच दिवशी वीजजोडणीचे काम उपकार्यकारी अभियंत्याच्या सांगण्यावरून करण्यात आले. विशेष म्हणजे ही जोडणी देताना दुसरी विद्युत तार तुटल्याने काही भागांत अंधार आहे.
देवगाव फाटा येथे फाटा वस्तीवर वीजपुरवठा करणारी महामार्ग रस्त्यावरील विद्युत तार तुटल्याने महिनाभरापासून अंधार आहे. ही तार जोडणीसाठी उपकार्यकारी अभियंता एम.एस. आरगडे यांना ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा विनंती करण्यात आली. मात्र, त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. या उलट या अभियंत्याने गावठाण फिडरवरून फाटा वस्तीत एका पेट्रोल पंपचालकास १.३ अंतर्गत एक खांब उभारून एका दिवसात वीजपुरवठा दिला आहे. विशेष म्हणजे १.३ कामासाठी कनिष्ठ अभियंता वैशाली चापके यांनी अंदाजपत्रक तयार केलेले नाही. या कामासाठी मंजुरीही देण्यात आलेली नाही. असे असतानाही १ मार्च रोजी एका खाजगी व्यक्तीकडून हे काम करून घेण्यात आले. त्यामुळे हे काम करताना वीज बंद केली. तेव्हा परमिट कोणी घेतले, हे परमिट दिले कोणी, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित उपकार्यकराी अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच जिजाबाई सोन्ने, उपसरपंच चंद्रकला सातपुते, सदस्य राधा साळेगावकर, गुंफाबाई चव्हाण यांनी कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
शासकीय खांबावरील वीजजोडणी चुकीची आहे. माझ्याकडून १.३ कामाचे अंदाजपत्रक तयार केलेले नाही. या सर्व प्रकाराविषयी उपकार्यकारी अभियंत्यांना विचारावे लागेल.
-वैशाली चापके, कनिष्ठ अभियंता