विद्यापीठ नामविस्तार लढ्याला परभणीतून मिळाली ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:54 PM2020-01-13T23:54:53+5:302020-01-13T23:55:48+5:30
औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सलग १८ वर्षे नेटाने लढलेला नामविस्तार लढा परभणीतील तीन पिढ्यांचा साक्षीदार ठरला आहे़ विशेष म्हणजे, या लढ्याला परभणी जिल्ह्यातूनच ऊर्जा मिळाली. नामविस्तार दिनाच्या लढ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचे योगदान राहिले आहे़
प्रसाद आर्वीकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सलग १८ वर्षे नेटाने लढलेला नामविस्तार लढा परभणीतील तीन पिढ्यांचा साक्षीदार ठरला आहे़ विशेष म्हणजे, या लढ्याला परभणी जिल्ह्यातूनच ऊर्जा मिळाली. नामविस्तार दिनाच्या लढ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचे योगदान राहिले आहे़
१४ जानेवारी १९९४ रोजी औरंगाबाद येथील विद्यापीठाचा डॉ़बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला अन् दरवर्षी हा नामविस्तार दिन साजरा केला जातो़ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने या मागणीसाठी झालेल्या लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदान यासंदर्भाने माहिती घेतली. तेव्हा जिल्ह्यातील तीन पिढ्यांनी या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्याचे समोर आले आहे़ विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर याच वर्षात पुलोद सरकारच्या काळात राज्याच्या दोन्ही सभागृहात या प्रस्तावाला एकमताने मंजुरी मिळाली; परंतु, या नामांतराला काही जणांनी विरोध केला आणि तेथून पुढे या लढ्याला सुरुवात झाली़
परभणी जिल्ह्यात नामांतर लढ्यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनेकांनी योगदान दिले. राज्यातील गढूळ झालेले वातावरण पाहता त्या काळात जिल्ह्यात पँत्थरच्या छावण्या, दलित, मुस्लीम सुरक्षा महासंघांची स्थापना झाली़ येथूनच पुढे नामांतराचा लढा तीव्र झाला़ विद्यापीठाच्या नामंतराची मागणी होत असताना याच काळात परभणी येथील श्रीधर उबाळे, शंकर भालेराव, मुकूंद मकरंद, रविंद्र तेलगोटे, रामचंद्र शेळके, शंकर शेळके हे युवक औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेत होते़ या विद्यार्थ्यांनी लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला़ जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत नागपूर ते औरंगाबाद असा लाँगमार्च काढण्यात आला होता़ त्यात या युवकांनी सहभाग नोंदविल्याने त्यांच्याविरूद्ध गुन्हेही नोंद झाले होते़ परभणीत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी़एच़ सहजराव, माधवराव हतागळे, रानूबाई वायवळ, विजय वाकोडे, के़टी़ उबाळे आदींनी या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला़ मोर्चे, आंदोलनांनी हा लढा पेटता ठेवण्यात आला़ विशेष म्हणजे, तीन पिढ्यांमधील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या लढ्यात हिरीरीने सहभागी झाले होते़ १८ वर्षांच्या संघर्षपूर्ण लढ्यानंतर औरंगाबाद येथील विद्यापीठाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला आणि त्यानंतर या लढ्याला यश प्राप्त झाले़
औरंगाबाद येथील विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी उभारलेल्या लढ्यात परभणी जिल्ह्याचे मोठे योगदान असून, चळवळीतील कार्यकर्त्यांच्या तीन पिढ्या या लढ्याच्या साक्षीदार ठरल्या आहेत.
शेवटपर्यंत लढा दिला
नामांतर ही आमच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई होती़ जिल्ह्यात आम्ही हिरीरीने या लढाईत सहभागी झालो़ या लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले़ काहींच्या घरांचे नुकसान झाले़ १७ वर्षाच्या या संघर्षामध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल झाले़ रासुकाखाली अटक करण्यात आली; परंतु, संघर्ष सोडला नाही़ नामांतराची मागणी असताना या विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला; परंतु, आता मात्र या विद्यापीठाला केंद्राचा दर्जा द्यावा, अशी आमची मागणी आहे़
-विजय वाकोडे, परभणी
आठवणींनीही शहारे येतात
नामांतराच्या लढ्याचा मी साक्षीदार आहे़ त्या काळात घडलेल्या घटना आठवल्या की आजही अंगावर शहारे येतात़ जागोजागी होणारी जाळपोळ आणि दंग्यामुळे वातावरण अस्वस्थ करणारे झाले होते़ विद्यापीठाचे नामांतर व्हावे, अशी यासाठी उभारलेल्या लढ्यात मी स्वत: सहभागी झालो होतो़ या लढ्यामध्ये कारावासही भोगावा लागला़ अखेर १७ वर्षानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला़ प्रत्यक्ष मागणी मान्य झाली नसली तरी जे दिलं ते आम्ही स्वीकारलं़
-बी़एच़सहजराव, परभणी
लढ्यात कारावास भोगला
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला मिळावे, यासाठी उभारलेल्या लढ्यामध्ये दोन-तीन दिवसांचा कारावास भोगावा लागला़ त्याकाळची परिस्थिती अत्यंत विदारक होती़ जागोजागी दंगल, जाळपोळ होत असल्याने त्या-त्या ठिकाणी जावून कार्यकर्त्यांना धीर देण्याचे काम केले़ प्रशासनाच्या विरोधात बांगडी मोर्चा काढला़ महिलांना संघटीत करून विद्यापीठाच्या नामांतरासाठी लढा उभारला़ परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात दररोज दौरे करून या लढ्याला गती दिली़
-रानूबाई वायवळ, परभणी
लढ्याने आत्मसन्मान दिला
१९७७ पासून नामांतराच्या लढ्यात सहभागी झालो आहे़ विद्यार्थी दशेत असताना नामांतर विरोधी कृती समितीने शिवाजी कॉलेज बंद पाडले़ त्यावेळी मी स्वत: पुढाकार घेवून १५ दिवस हे कॉलेज सुरू ठेवले़ या संपूर्ण लढ्याच्या काळात परभणी, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी कारावास भोगला आहे़ नामांतराचा लढा हा सामाजिक समतेचा लढा होता़ या लढ्याने दलित तरुण संघटन उभे राहिले़ या लढ्याच्या माध्यमातून समाजामध्ये आत्मसन्मान निर्माण झाला़
-माधवराव हतागळे, परभणी