ध्येयप्राप्तीसाठी प्राणायाम महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:09+5:302021-06-23T04:13:09+5:30
परभणी : युवकांनी स्वतःच्या क्षमता, कुटुंब, समाज आणि देशाचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. निश्चित ध्येय प्राप्तीसाठी योग ...
परभणी : युवकांनी स्वतःच्या क्षमता, कुटुंब, समाज आणि देशाचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. निश्चित ध्येय प्राप्तीसाठी योग आणि प्राणायामला आयुष्याचा अविभाज्य घटक बनवून स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन डॉ. एस.व्ही. सुब्बाराव यांनी केले.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवसीय ऑनलाइन शिबिरात सुब्बाराव बोलत होते.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ.दीपक गुंडू, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, उपप्राचार्या डॉ. विजया नांदापूरकर, गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे आदींची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, योग-प्राणायाम केल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. त्याचा फायदा त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी होतो. अशाप्रकारचा अभ्यास तीन दिवस न करता नियमित करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. सुब्बाराव यांनी अनेक प्रकारच्या योगासनांची आणि प्राणायामची प्रात्याक्षिके करून दाखवली. या तीन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरास बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यशस्वीतेसाठी एनसीसीप्रमुख डॉ. प्रशांत सराफ, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. तुकाराम फिसफिसे, क्रीडा संचालक डॉ. संतोष कोकीळ, प्रा. प्रल्हाद भोपे आदींनी परिश्रम घेतले.