परभणीत मान्सूनपूर्व स्वच्छतेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:49 AM2019-05-16T00:49:04+5:302019-05-16T00:49:43+5:30
महानगरपालिकेने शहरांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना सुरुवात केली असून १५ मे रोजी येथील नेहरू पार्क भागातील नाल्यांची सफाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेने शहरांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना सुरुवात केली असून १५ मे रोजी येथील नेहरू पार्क भागातील नाल्यांची सफाई करण्यात आली.
दरवर्षी महापालिकेच्या वतीने शहरांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे हाती घेतली जातात. यावर्षी देखील या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी नेहरू पार्क भागातील नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला. नगरसेवक जलालोद्दीन काजी, प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आले.
दरम्यान आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी दुपारी मनपा कार्यालयात स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली. स्वच्छता निरीक्षक यांनी झोनमधील सर्व नाल्या आणि गटारांची माहिती सहाय्यक आयुक्त, अभियंता, झोनप्रमुखांना द्यावी तसेच अधिकाऱ्यांशी समन्वय साधून स्वच्छतेची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई महापालिकेकडून केली जात असली तरी प्रभागांमधील छोट्या नाल्या साफ केल्या जात नाहीत. या भागातही पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली तर सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघेल.