डाऊन सिंड्रोम बालकांचा गट तयार करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:42+5:302021-03-18T04:16:42+5:30
परभणी : बालकांमध्ये आढळणाऱ्या डाऊन सिंड्रोम या गंभीर आजाराच्या बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, यासाठी येथील बालरोगतज्ज्ञ यांनी ...
परभणी : बालकांमध्ये आढळणाऱ्या डाऊन सिंड्रोम या गंभीर आजाराच्या बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, यासाठी येथील बालरोगतज्ज्ञ यांनी पुढाकार घेतला असून, या बालकांचा गट तयार करून नियमित मोफत समुपदेशन व उपचाराचा सल्ला दिला जाणार आहे.
गुणसुत्रातील दोषामुळे बालकांमध्ये जन्मजात आढळणारा आजार म्हणजे डाऊन सिंड्रोम. या आजारातील बालकांचा बुद्ध्यांक मर्यादित असतो. त्यामुळे शारीरिक वाढ नियमित बालकांप्रमाणे होत नाही. अनेक वेळा डाऊन सिंड्रोम या आजाराविषयी माहिती नसल्याने बालकांवर योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे या बालकांची कुचंबणा होते. तसेच हे बालक आयुष्यभर परावलंबी राहतात. देशामध्ये ७०० बाळांच्या जन्मामागे एक बालक डाऊन सिंड्रोमचे जन्माला येते. परभणी जिल्ह्यात या आजाराच्या बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे परभणी जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेने डाऊन सिंड्रोम आजार असलेल्या बालकांची माहिती एकत्रित करण्याचा आणि या बालकांच्या पालकांना उपचारासंदर्भात सल्ला देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याच अनुषंगाने सिंड्रोम बालकांचे एक शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी सध्या अशा बालकांची नोंदणी केली जात आहे. डाऊन सिंड्रोम असलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी डॉ. स्वप्नील खळीकर बँक कॉलनी वसमत रोड, परभणी किंवा डॉ. संदीप कार्ले, सर्वज्ञ बाल रुग्णालय, विष्णूनगर परभणी यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन बालरोगतज्ज्ञ संघटनेचे सचिव डॉ. माधव राठोड, डॉ. श्रीकांत मुखेडकर यांनी केले आहे. डाऊन सिंड्रोम हा गुणसुत्राशी निगडित आजार असल्याने कायमचा दुरुस्त होऊ शकत नाही. मात्र, योग्य वैद्यकीय उपचार, विशेष प्रशिक्षण, बालकांमधील क्षमता ओळखून व्यवसाय प्रशिक्षण आणि प्रोत्साहनपर वातावरण निर्मिती केल्यास डाऊन सिंड्रोम आजाराची मुले ही सामान्य जीवन जगू शकतात, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप कार्ले यांनी सांगितले.
काय आहे डाऊन सिंड्रोम
डाऊन सिंड्रोम हा गुणसुत्रांशी संबंधित असलेला जन्मजात आजार आहे. सामान्य नागरिकांच्या पेशींमध्ये ४६ गुणसूत्रे असतात. त्याच्या २३ जोड्या होतात. डाऊन सिंड्रोम असलेल्या बालकांमध्ये २१ क्रमांकाच्या गुणसुत्रावर एक सूत्र अधिक असते. त्यामुळे एकूण गुणसुत्रांची संख्या ४७ होते. डाऊन सिंड्रोम असलेल्या बाळांची वाढ सर्वसामान्य बालकांप्रमाणे होत नाही.
आजाराची लक्षणे
या आजारात बाळांमध्ये जन्मापासूनच विविध प्रकारचे दोष आढळतात. त्यात हृदय दोष, उंची कमी असणे, मेंदूची वाढ कमी होणे, बुध्यांक कमी असणे, श्रवण दोष, दृष्टिदोष, थायरॉइडचा आजार, मणक्याशी संबंधित आजार, आतड्यांचे विकार आदी आजार या बालकांना जडतात.